प्रशासनाने जाहिर केलेली आनेवारी तात्काळ दुरुस्त करण्याची शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । धाराशिव

धाराशिव जिल्हा प्रशासनाने जाहिर केलेली आनेवारी चुकीची असून त्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील खरीप पिकांची महसुल विभागामार्फत जी आणेवारी काढण्यात आलेली आहे. ती वस्तुस्थितीला धरुन नाही. यावर्षी जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस झालेला नाही. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांना आपली पिके जगविता आली आहेत. बाकीच्या शेतकऱ्यांच्या पिकांची राख रांगोळी झाली आहे. प्रशासनाने सदर आणेवारी ही पाणी दिलेल्या पिकांची पाहणी करुन त्याची पैसेवारी वाढवलेली आहे. तसेच गतवर्षी प्रशासनाच्या चुकीच्या अहवालामुळेच धाराशिव व लोहारा तालुक्यातील शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहिला आहे. शासन एकीकडे दुष्काळ जाहिर करण्याच्या तयारीत असून आपल्या स्थानिक प्रशासनाच्या चुकीच्या अहवालामुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व्यापारी, विद्यार्थी देशोधडीला मिळाला आहे. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती निष्ठ अहवाल देण्याचे आदेश द्यावेत अशी विनंतीही या निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील, आमी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, तालुकाप्रमुख सतिश सोमानी, जिल्हा युवा अधिकारी सुरज साळुंके आदींच्या सह्या आहेत.