शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात विविध ठिकाणी उपनेते नितीन बानुगडे (पाटील) यांच्या पुढाकाराने वक्ता प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी भारावलेल्या 550 वक्त्यांना या प्रशिक्षण शिबिरांतून मार्गदर्शन मिळाले. त्यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी अशा सर्वांसाठी बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.

मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व विदर्भ अशा पाच विभागांकरिता अनुक्रमे संभाजीनगर, रत्नागिरी, पुणे, नाशिक व नागपूर शहरात या स्पर्धेची पहिली फेरी बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 ते गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या विभागीय स्पर्धांमधून निवडून येणाऱ्या स्पर्धकांची अंतिम फेरी मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्र दिले जाणार आहे. त्याचबरोबर पहिल्या आणि अंतिम फेरीत विजयी होणाऱ्या सर्व मान्यवरांना स्मृतिचिन्हे व रोख पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

स्पर्धेत नावे नोंदविण्यासाठी इच्छुकांनी शनिवार, 20 ऑक्टोबरपूर्वी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शिवसेना भवन, दादर येथील दूरध्वनी क्र. 1800229595 किंवा मारुती साळुंखे (8080031133) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे केले आहे. नोंदणी केलेल्या सर्वांना स्पर्धेचे विषय व नियम कळविले जातील.