
सामना ऑनलाईन, मुंबई
बेकायदा बॅनरविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांना सत्तेचा माज दाखवत मारहाण करणाऱ्या तसेच कारवाईत विघ्न आणणाऱ्या भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांच्यासह त्यांच्या सात कार्यकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलेच फैलावर घेतले. दादागिरी दाखवत पालिकेच्या कारवाईत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तुमच्यावर अवमानाची कारवाई का करू नये असे खडसावत हायकोर्टाने नगरसेवकासह कार्यकर्त्यांना नोटीस बजावली. एवढेच नव्हे तर याप्रकरणी आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
बेकायदा होर्डिंगमुळे राज्यातील अनेक शहरे विद्रुप झाली असून त्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती महेश सोनक यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. अंधेरी पूर्व येथील भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांनी बेकायदा होर्डिंगविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांना धमकावले एवढेच नव्हे तर मारहाण करत या कारवाईचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांचा कॅमेराही भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी हिसकावून घेतला. याप्रकरणी मुंबई महापालिकेने या नगरसेवकासह कार्यकर्त्यांविरोधात हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली आहे. आज पार पडलेल्या सुनावणीत हायकोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालिकेच्या नियमांचे उल्लंघन आणि अधिकाऱ्यांना केलेल्या मारहाणप्रकरणी कारवाई का करू नये असा खरमरीत सवाल करीत भाजप नगरसेवकाला या कृत्याचा जाब विचारला. तसेच पुढील सुनावणी वेळी कोर्टासमोर आपले म्हणणे मांडण्याचे आदेश देत खंडपीठाने याबाबतची सुनावणी तीन आठवडय़ांसाठी तहकूब केली.



























































