सणासुदीच्या दिवसांत महावितरणचे डोके फिरले,नऊ तास वीज बंद राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

फेब्रुवारी महिन्यात अचानकपणे सुरू करण्यात आलेल्या लोडशेडिंगमुळे उद्रेकाच्या उंबरठ्यावर आलेल्या संभाजीनगरात पुन्हा अचानक  सोमवारपासून लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे. ऐन सणांच्या दिवसात 3 ते 9 तासापर्यंत लोडशेडिंग सुरू करण्यात आल्याने शहरात संताप व्यक्त होत असून, त्याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विजेचा तुटवडा आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले असले तरी राज्यावर पुन्हा एकदा वीजटंचाईचे संकट येऊ पाहत आहे.

दोन आठवड्यांपूर्वीच महावितरणने राज्यात विक्रमी वीजपुरवठा केला होता. त्यामुळे मागणी वाढली तरी त्यानुसार वीजपुरवठा करण्यास महावितरण सक्षम असल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र आता या विक्रमी वीजपुरवठ्याचे पितळ उघडे पडले आहे. आज सोमवारपासून मागणीच्या तुलनेत विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने महावितरणने आज सोमवारपासून शहर आणि जिल्ह्यात लोडशेडिंग सुरू केले आहे. दोन दिवसानंतर नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. नऊ दिवस देवीचा जागर असलेल्या या उत्सवावर आता लोडशेडिंगने संक्रांत आणली आहे. ऐन सणात सुरु करण्यात आलेल्या लोडशेडिंगमुळे शहरात संतापाचे वातावरण आहे.

प्रकाशगड येथून आदेश येताच शहरात आजपासून लोडशेडिंगची अचानक अंमलबजावणी सुरु करण्यात आली. जी 1 ते जी ३ या गटात सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन टप्प्यात ३ ते ९ तासापर्यंत लोडशेडिंग केले जात आहे, असे सांगितले जात असले तरी अख्ख्या शहराला या लोडशेडिंगने विळखा घातला आहे. या तीन ग्रुपशिवायही शहरातील प्रत्येक भागातील वीज दोन-ते तीन तास गुल होत आहे. यासाठी मात्र बिघाड झाल्याचे विंâवा दुरुस्तीचे काम  असे कारण दिले जात आहे.

…तर संतापाचा उद्रेक होणार

पेâब्रुवारी महिन्यात महावितरणने अशाच प्रकारे अचानक लोडशेडिंग सुरू केले होते. यावेळी शहर उद्रेकाच्या उंबरठ्यावर होते. शिवसेनेसह काही पक्ष-संघटनांच्या वतीने महावितरणवर मोर्चे काढून संताप व्यक्त करण्यात आला होता. काही जणांनी मुख्य अभियंत्यांच्या दालनाची नासधूस केली होती. त्यामुळे शहरातील लोडशेडिंग संपविण्यात आले होते. आता पुन्हा तशीच परिस्थिती आली आहे.

वीजपुरवठा कमी झाला

दरम्यान, अचानकपणे सुरू करण्यात आलेल्या लोडशेडिंगसाठी महावितरणने वीजपुरवठा कमी होत असल्याचे कारण दिले आहे. थर्मलमध्ये कोळसा पुरवठा होत नसल्याने येथून मिळणाऱ्या 6 हजार 500 मे. वॅ. ऐवजी 5 हजार 239 मे. वॅ. वीज मिळत आहे. कोयना येथेही जादा वीज उत्पादित करता येत नाही. त्यामुळे हे लोडशेडिंग सुरु करण्यात आले असून, हे तात्पुरते स्वरुपाचे असल्याचेही महावितरणने म्हटले आहे.

वीज ग्राहक अनभिज्ञ

महावितरणने आज सोमवारपासून लोडशेडिंग सुरू केले असले तरी वीज ग्राहकांना याची कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. सकाळपासून लोडशेडिंग सुरू झाले, अनेकांना नेहमीप्रमाणे वीज गुल झाली असावी, असा समज झाला.

हे तर छुपे लोडशेडिंग!

महावितरणकडून राज्याला मागणीइतका वीजपुरवठा केला जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच आहे. विजेची टंचाई असल्याने शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून वीज गुल होण्याचे प्रकार वाढले आहेत. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळेत तास ते दोन तास वीज गुल होत होती. आज सोमवारपासून सुरु करण्यात आलेल्या लोडशेडिंगमुळे मागील काही दिवस महावितरणकडून वीज गुल करण्याचा प्रकार म्हणजे छुपे लोडशेडिंग होते, हे आता समोर आले आहे.

भावनांशी खेळू नका, महागात पडेल

महावितरणची लोडशेडिंग हिंदू सणांच्या मुळावरच असते. सर्व नियम धाब्यावर बसवून ऐन सणाच्या दिवसात सुरू करण्यात आलेली लोडशेडिंग म्हणजे सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळ सुरू आहे, मात्र त्यांच्या भावनांशी खेळू नका, नसता महागात पडेल, असा इशारा शिवसेना नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला. लोडशेडिंगमुळे संतापाचा बांध पुâटण्याअगोदर लोडशेडिंग बंद करा, असे खासदार खैरे यांनी सांगितले.