
सामना प्रतिनिधी । अंबड
अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील असलेला सोन्याचा नेकेल्स, गंठन, एक झुंबर जोड, दोन काडी पोत, एक सोन्याचे ओम व नगदी रोख १५ हजार रूपये असा एकूण १ लाख ५३ हजार ९०० रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ८ ऑक्टोंबरच्या रात्री घडली असून जालना जिल्ह्यातील अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पांगरखेडा येथील राहणारे कृष्णा भगवान कोल्हे (३१) हे ८ ऑक्टोबर रोजी शेतातुन काम करून रात्री नऊच्या सुमारासव त्यांच्या पत्नी शकुंतलाबाई ह्या त्यांच्या घराला कुलुप लावून घराच्या गच्चीवर झोपले व दुसऱ्या दिवशी ९ ऑक्टोंबर रोजी सकाळी गच्चीवरून खाली आल्या असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
कपाटात ठेवलेले रोख १५ हजार रूपये, ६३ हजार रूपये किंमतीचे एक तीन तोळा सोन्याचे गंठण, ३७ हजार ८०० रूपये किंमतीचे एक सोन्याचा नेकलेस, १८ ग्रँम, १४ हजार रूपये किंमतीचे झुंबर जोड, तिन कप्पे असलेले अंदाजे वजन ७ ग्रँम, २१ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दोन कांडी पोत, २ हजार १०० रूपये एक सोन्याचा १ ग्रँम ओम असा एकुण १ लाख ५३ हजार ९०० रूपयाचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात कृष्णा भगवान कोल्हे रा. पांगरखेडा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. डी. सोन्ने हे करीत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सी. डी. शेवगण, सहायक पोलीस निरीक्षक एल. डी. सोन्ने, स्थानिक गुन्हे शाखेचे रामेश्वर बगाटे, कृष्णा तंगे, गडदे, भिगंरप्रिट शेजाळ, कर्मचारी क्षीरसागर, वाघ, पाठक, बीट जमादार रामराव जाधव,आयबाईक पथकाचे पोकॉ,वाकेकर, घोडके यांनी भेटी दिल्या.
































































