
पंडित बोराडे । मंठा
मंठा शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माहूर येथील माळावर जागृत रेणुका मातेचे देवस्थान आहे. मंठा शहरात आहे. नवसाला पावणारी रेणुका मातेची भव्य दिव्य व हसतमुख अशी मूर्ती तांदळा मंठ्याच्या मंदिरात आहे. या ठिकाणी नवरात्र व चैत्र शु. पौर्णिमेला अशी वर्षातून दोन वेळेस यात्रा भरते. या ठिकाणी लांबून भाविक दर्शनासाठी येतात. अनेक जण नवस फेडण्यासाठी संभाजीनगर, नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणाहून येतात. खास करून या तालुक्यातील लोक जे बाहेर गावी कामानिमित्ताने गेले आहेत. असे सर्व समाजातील ग्रामस्थ हे या नवरात्र व चैत्रपौर्णिमेला रेणुका मातेच्या दर्शनासाठी आवर्जून गावाकडे येतात.
या ठिकाणी नवरात्रीत नऊ दिवस सकाळ-संध्याकाळ देवीची आरती केली जाते. तसेच या ठिकाणी नऊ दिवस धरणे धरून बसतात. देवीचा परिसर अत्यंत रम्य आहे. रेणुका देवीच्या मंदिरासमोर भक्तांसाठी खूप मोठा सभामंडप असून दरवर्षी प्रमाणे वाहनचालकांकडून सकाळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोफत चहाची व्यवस्था केली जाते. तसेच अनेक भाविक या ठिकाणी भंडारा, नवस फेडतात. यामध्ये विशेष बाब म्हणजे सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्यातर्फे दरवर्षी सर्व सेलूतील नागरिकांसाठी प्रसादाची व्यवस्था केली जाते.
देवीची आख्यायिका
रेणुका देवीचे मंदिर हे मूळ मंठा शहरापासून तीन कि. मी. अंतरावर असलेल्या टोकवाडी या गावच्या शिवारात आहे. येथील जिजाबाई या रेणुका मातेच्या निस्सिम भक्त होत्या. जिजाबाई रोज सकाळी चार वाजता देवीच्या पूजेसाठी नियमितपणे येत होत्या. याची चाहूल देखील कुणाला लागत नव्हती, असे बरेच दिवस झाले. नंतर गावात जिजाबाई बद्दल कुजबुज सुरू झाली. ही जिजाबाई एवढ्या अंधारात जंगलात कुठे जाते. याबद्दल तर्क-वितर्कपणे बोलले जाऊ लागले परंतु जिजाबाईने या गोष्टीकडे गांभीर्याने न घेता आपली देवीचरणी असलेली भक्ती उपासना चालूच ठेवली. त्यानंतर जिजाबाईचा घरच्यांनी मानसिक छळ सुरू केला. तरीपण जिजाबाईने आपली असलेली रेणुका मातेवरील भक्ती थोडीपण ढळू दिली नाही. त्यांनी नियमितपणे रेणुका मातेच्या भक्तीपोटी रोज सकाळी देवीच्या दर्शनाचा नित्यनियम चालूच ठेवला. असे बरेच दिवस लोटले. त्यानंतर बरीच वर्षे लोटले. तरीही जिजाबाई नियमित ठरल्याप्रमाणे देवी दर्शनासाठी गेल्या असताना देवी जिजाबार्इंना प्रसन्न झाली आणि वरदान मागण्यास सांगितले.
त्यावेळेस जिजाबार्इंनी रेणुका मातेला माझ्या सोबत माझ्या गावी यावे म्हणून आग्रह केला. परंतु त्यावेळेस रेणुका मातेने जिजाबाईस एक अट घातली. मी तुझ्या सोबत येते परंतु तू मागे फिरून पाहू नकोस, मी सोबत आहे किंवा नाही हे बघायचे नाही. या अटीवर देवी जिजाबाई सोबत जाण्यास निघाली असता थोड्या अंतरावर गेल्यानंतर गावाकडून टोकवाडी येथून काही गावातील लोकं हातात मशाली घेऊन येतांना दिसले. त्यावेळेस जिजाबार्इंनी रेणुका मातेचा धावा करुन आता मला वाचव माते म्हणून मागे बघितले. त्याच क्षणी देवी गायब झाली. रेणुका माता गायब झालेली पाहून आणि समोरून आलेले लोक पाहून जिजाबाई घाबरली आणि देवीचा धावा करू लागली. त्यामुळे देवीने पुन्हा जागृत होऊन जिजाबाईला आपल्या पायथ्याशी जागा दिली आणि वरदान दिले की, जो भाविक माझ्या दर्शनासाठी येईल, त्याने तुझे दर्शन घेतल्याशिवाय त्याची माझ्यावरील भक्ती सार्थ ठरणार नाही. त्यामुळे आजही रेणुका मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक अगोदर जिजाबाईचे दर्शन घेतो आणि त्यानंतर रेणुका मातेचे दर्शन घेतो.
































































