पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
हडपसर- योगेश टिळेकर

सामना ऑनलाईन,पुणे

येवलेवाडीतील डीपीच्या प्रकरणात गोत्यात आलेले भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार योगेश टिळेकर यांचा आणखी एक उद्योग समोर आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ऑप्टिकल फायबर टाकणाऱ्या कंपनीकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी त्यांच्यासह तिघांवर कोंढवा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार योगेश टिळेकर, त्यांचे भाऊ चेतन टिळेकर व त्यांचा कार्यकर्ता गणेश कामठे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र लक्ष्मण बऱ्हाटे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. बऱ्हाटे हे एरंडवणे भागातील ‘ई-व्हिजन टेली इफ्रा प्रा. लि.’ कंपनीत व्यवस्थापक म्हणूनही कार्यरत आहेत.

गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव

काही आठवडय़ांपूर्वीच बऱ्हाटे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती, मात्र ऐन गणेशोत्सवात हा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी रवींद्र बऱ्हाटे यांच्यावर दबाव आला होता. राज्यातील अनेक बडय़ा नेत्यांनी यासाठी खटाटोप केला होता.   टिळेकर यांनाही शांत बसण्यास सांगण्यात आले होते. मात्र बऱ्हाटे यांनी तक्रारीचा पाठपुरावा सुरूच ठेवल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.