
सामना ऑनलाईन, चंद्रपूर
मूल नगरपरिषदेतील भाजपच्या दोन नगरसेवकांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची रवानगी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीत केली आहे. मिलिंद खोब्रागडे आणि अनिल साखरकर अशी या दोन नगरसेवकांची नावे आहेत. मिलिंद खोब्रागडे हे नगरपरिषदेचे माजी सभापती देखील आहेत. या दोघांसह पराग दुधे आणि त्यांच्या पत्नीलाही पोलिसांनी अटक केली आहे.
पराग दुधे यांनी त्यांच्या पत्नीला मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. उपचारादरम्यान रूग्णालयातील परिचारिका प्रज्ञा तुलाराम भैसारे यांचे आणि दुधे दांपत्यामध्ये वाद झाला होता. या वादाची माहिती मिळाल्याने भाजप नगरसेवक मिलिंद खोब्रागडे आणि अनिल साखरकर हे रुग्णालयात आले होते. यावेळी या दोघांनी दुधे दांपत्यासह आपल्याला शिवीगाळ केले, फाईल फेकून मारली असा आरोप भैसारे यांनी केला होता. त्यांनी केलेल्या तक्रारीमुळे पोलिसांनी 2 नगरसेवकांसह चौघांना अटक केली होती.


























































