प्रेम प्रकरणातून संगमनेरमध्ये तरुणाचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमनेर

संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत खांडगाव शिवारात एका तरुणाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या झाली असून. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

प्रमोद संजय वाघ (17) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो संगमनेर महाविद्यालयात इयत्ता बारावीचे शिक्षण घेत होता. या घटनेने संगमनेरच्या शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

गुरुवारी सकाळी खांडगाव शिवारातील कपारेश्वर मंदिर परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळला. सहाय्यक निरीक्षक शंकरसिंह राजपूत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदरचे प्रकरण तालुका हद्दीत असल्याने त्यांनी तालुक्याचे निरीक्षक सुनील पाटील यांना याबाबत माहिती दिली. तालुका पोलिसांनी चौकशी केली असता मृत तरुणाची ओळख प्रमोद संजय वाघ असल्याचे स्पष्ट झाले. दोन दिवसांपासून तो बेपत्ता असल्याची फिर्याद संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यामुळे तालुका पोलिसांकडून त्याचा शोध सुरूच होता. त्यातच आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.

तपासादरम्यान सदर मुलाच्या प्रेमप्रकरणाबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. तपासाची दिशाही त्याच बाजूने सुरू होती. या प्रकरणात पोलिसांना एका अल्पवयीन मुलावर संशय होता. त्याच्यावर बारकाईने लक्षही ठेवले जात होते. गुरुवारी सकाळी प्रमोदचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तत्काळ ‘त्या’ अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने खून केल्याची कबुली दिली आहे.