
सामना प्रतिनिधी। कुडाळ
शिवसेना व कोकण असे अतुट नाते आहे. त्यामुळेच हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कोकणावर प्रेम होते. बाळासाहेब व शिवसेना पक्ष दैवत मानून आणि विधानसभेवर भगवा झेंडा फडकवण्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी आतापासूनच जोमाने कामाला लागा असे आवाहन शिवसेना पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर यांनी युवासैनिकांना केले. तसेच पक्षसंघटना वाढीबाबत आवश्यक सुचना करून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुक जिंकण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन त्यांनी केले आहे.
कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृहावर शनिवारी कुडाळ तालुका युवासेनेची बैठक पार पडली. या बैठकीत बोरकर यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी तसेच समस्यांबाबत आढावा घेत संघटना वाढीबाबत आवश्यक सुचना दिल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपजिल्हाप्रमुख सुशील चिंदरकर आदींसह युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोरकर यांनी विभागनिहाय आढावा घेतला. त्यानंतर संघटना बांधणी तसेच रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत आवश्यत सुचना त्यांनी केल्या. शिवसेना 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या ब्रिदाने काम करत आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न, समस्या सोडवण्यावर भर द्या. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पक्षसंघटना वाढ करून आगामी निवडणुकीत लोकसभा व विधानसभेच्या जागा जिंकण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन त्यांनी केले.




























































