
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
या वर्षी पावसाने दगा दिल्यामुळे जिह्यासह मराठवाडय़ात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाशी सामना करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली असून जिह्याजिह्यात मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस दुष्काळाचा आढावा घेत आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा पहिला पाहणी दौरा राज्याचे परिवहनमंत्री शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी सुरू केला आहे. आज पैठण आणि गंगापूर तालुक्यातील खरीप पिकांची पाहणी करून शेतकऱयांशी संवाद साधला. शेतकऱयांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, पीककर्ज, बोंडअळीचे अनुदानदेखील प्राप्त झालेले नाही, अशा तक्रारी शेतकऱयांनी मंत्री रावते यांच्यासमोर मांडल्या. मग्रारोहयोच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आलेला नसल्याचे रावते यांच्या निदर्शनास आले.
अब्दुलपूर तांडय़ात कृषी अधिकाऱयांची भंबेरी
अब्दुलपूर तांडा येथील अर्जुन चव्हाण यांच्या शेतातील कापूस, तूर पिकाची पाहणी मंत्री रावते यांनी केली. कापसाचे पीक कापणी प्रयोग कशा पद्धतीने केला, असा सवाल रावते यांनी कृषी अधिकाऱयांना विचारातच अधिकाऱयांची भंबेरी उडाली. कागदोपत्री अहवाल न देता प्रत्यक्ष पाहणी केली तर चित्र आणखी वेगळे राहील. तुरीला शेंगा येणार नसल्याने हे पीक हातातून गेले असल्याचे शेतकऱयांनी सांगितले.
-गंगापूर तालुक्यातील आढावा बैठक दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत गावागावात आणेवारी समिती गठीत केली नसल्यामुळे अधिकाऱयांनी कार्यालयात बसून नजर आणेवारीचा अहवाल तयार केल्याचे शिवसैनिकाने सांगताच अधिकाऱयांचे बिंग फुटले.
-या वर्षी पावसाने दगा दिल्यामुळे शेतशिवार हिरवेगार दिसत असले तरी शेतकऱयांच्या हातात त्यातून एक छदामही पडणार नाही. 1972 च्या दुष्काळापेक्षाही भीषण परिस्थिती या वर्षी निर्माण झाली आहे. खरीप हंगामाची राखरांगोळी झाली असून रब्बीचीही आशा मावळली आहे. पाणीसाठे कोरडेठाक पडल्यामुळे पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण झाले. हाताला काम नसल्यामुळे गावेच्या गावे ओस पडण्याची शक्यता असून पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकऱयांवर स्थलांतराची वेळ आली आहे. जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असल्याचे भीषण चित्र जिह्यातील पैठण, गंगापूर तालुक्यांत पाहायला मिळाले. साधारणपणे असेच चित्र संपूर्ण मराठवाडय़ात आहे.
चारा छावण्यांऐवजी थेट शेतकऱयांना अनुदान
दिवाकर रावते यांच्याकडे शेतकऱयांनी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली, परंतु रावते यांनी चारा छावण्या सुरू करू नयेत या मताचा मी आहे. छावण्या सुरू करण्यापेक्षा जनावरांच्या संख्येच्या आधारावर थेट शेतकऱयांना अनुदान देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले.































































