नानांच्या योगदानाचा आदर करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

>> जयराम नारायण देवजी

मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक, रेल्वेचे जनक, दानशूर व्यक्तिमत्त्व नाना ऊर्फ जगन्नाथ शंकरशेट यांनी महाराष्ट्राला दिलेले योगदान अतुलनीय आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा नानांनी महाराष्ट्राला दिलेल्या योगदानाचा पाढा किती वेळा वाचावा? वृत्तपत्रांतून केलेले लिखाण आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांच्या डोक्यावरून जातेय की, मुद्दामहून दुर्लक्ष केले जातेय याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. नानांच्या स्मारकाकरिता केवळ जागा उपलब्ध केल्याने काय होणार? ज्याप्रमाणे इतर समाजाच्या समाजसुधारकांच्या स्मारकाकरिता महाराष्ट्र शासन निधींची तरतूद करते त्याचप्रमाणे नानांचे स्मारक उभारण्याकरिता आजपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या वतीने आर्थिक निधीची तरतूद करण्यात आलेली नाही.

नुकतेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आगामी निवडणुकांच्या तोंडावर मतांच्या किंवा सोयीच्या राजकारणाकरिता भाईंदर येथील मेट्रोच्या प्रस्तावित स्टेशनला जैन मुनी महावीर स्वामी यांचे नाव देण्याची घोषणा केली, परंतु आज जगभरात ज्या रेल्वेचे जाळे विणले गेले आहे त्या रेल्वेकरिता नानांनी पुढाकार घेऊन आपल्या गिरगाव येथील वाड्यात रेल्वेची कचेरी चालू करून बोरीबंदर ते ठाणे अशी सर्वप्रथम रेल्वे सुरू करून भविष्यातील निर्माण होणारा दळणवळणाचा प्रश्न सोडवला त्या नानांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला देण्यात यावे याकरिता तमाम नानाप्रेमी जनता झटत आहेत. त्या नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस नामांतराचा प्रश्न अजून रेंगाळत आहे. नानांनी दूरदृष्टी ठेवून आपल्या लाख मोलाच्या जमिनी दान देऊन ज्या सुधारणा केल्या त्या कोणा एका समाजासाठी नव्हत्या. त्याचा फायदा आज सर्वच स्तरांतील, समाजातील, जनतेस होत आहे. नानांनी सुरू केलेली रेल्वे आज देशभरात धावत आहे, तर नानांचे नावही जगभरात व्हायला हवे हा शुद्ध हेतू स्टेशनच्या नामांतरामागील आहे. सत्तेत आल्यावर केवळ सहा महिन्यांत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुघलसलाई स्थानकाचे नामकरण पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव दिले. मग ब्रिटिशांच्या राज्यात नानांनी देशात प्रथम रेल्वे सुरू केली, त्यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्याकरिता महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांचे हात का थरथरत आहेत?