सकाळी जीआर काढतात, संध्याकाळी मागे घेतात! अशोक चव्हाणांची शिक्षणमंत्र्यांवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, देगलूर

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शालेय शिक्षण विभागावर टीका केली आहे. शिक्षणाचा प्रश्न असो की शिक्षकांचा, सकाळी निघालेला जीआर संध्याकाळी माघारी घेतला जातो अशा शब्दात चव्हाण यांनी ही टीका केली आहे. सरकारने निर्णय घेत असताना फार विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे मात्र तसे होताना दिसत नाही असं चव्हाण यांचं म्हणणं आहे. देगलूर शहरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

शालेय पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला होता. याबद्दल अशोक चव्हाण यांनी शिक्षण विभागाचा निषेध करीत हा मजकूर छापणाऱ्यांविरूद्ध कारवाईची मागणी केली आहे. नांदेड जिल्ह्य़ाला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणीही चव्हाण यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्याची आणेवारी पन्नास पैश्यांच्यावर दाखवण्यात आली आहे, मात्र खरी परिस्थिती बिकट असल्याचं चव्हाण यांचं म्हणणं आहे.

अशोक चव्हाण यांचा देगलूर तालुक्यातील तीस तर जिल्ह्य़ातील चौतीस शिक्षकांना गुरू गौरव पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे तसेच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त सहा शिक्षकांचाही त्यांनी या कार्यक्रमात सन्मान केला.