
सामना प्रतिनिधी । शिर्डी
श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या साईबाबांच्या 100 व्या पुण्यतिथी उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मुंबईतील द्वारकामाई मंडळाने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली असून, प्रवेशद्वारावर भव्य ‘ब्रम्हांडनायक’ देखावा उभारण्यात आला आहे. तीन दिवस चालणाऱया उत्सवकाळात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.
अग्रवाल म्हणाल्या, यंदा श्री साईबाबांच्या समाधीस 100 वर्षे पूर्ण होत असल्याने या उत्सवाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे श्रींच्या समाधीच्या दर्शनाकरिता साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरासह चावडीसमोर, मारुती मंदिर ते शामसुंदर हॉल, साई उद्यान परिसर, मोबाईल लॉकर परिसर, जुना पिंपळवाडी रोड दर्शनरांग व फूटपाथ, नवीन श्री साई प्रसादालय परिसर आदी ठिकाणी 66 हजार 500 चौरस फुटाचे मंडप उभारण्यात आलेले आहेत. अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी साई धर्मशाळा, भक्तनिवासस्थान (500 रुम), साईनगर मैदान, सर्व्हे नं. 1, त्रिकोणी जागा, शासकीय विश्रामगृह व श्री साई प्रसादालयाच्या पश्चिमेला 55 हजार 500 चौरस फुटाचे मंडप उभारण्यात आलेले आहेत. भाविकांच्या वाहनांसाठी ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी आणि नवीन पिंपळवाडी रस्त्यालगत सुमारे 55 हजार चौरस फुटाचे मंडप टाकण्यात आलेले आहेत. पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडपावर प्लॅस्टिक ताडपत्री टाकण्यात आलेली आहे. शिर्डी व शिर्डी परिसरातील 7 मंगल कार्यालये अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी उपलब्ध ठेवण्यात आलेली आहेत.
श्री पुण्यतिथी उत्सवानिमित्त समाधी मंदिर व मंदिर परिसरात, व्दारकामाई, चावडी व गुरुस्थान या ठिकाणी हैदराबाद येथील दानशूर साईभक्त विजया नायडू यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. मुंबई येथील व्दारकामाई मंडळाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व प्रवेशव्दारावर ब्रम्हांडनायक हा भव्य देखावा उभारण्यात आला आहे. उत्सवात साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन साईभक्तांकरिता 150 क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू व 130 क्विंटल साखरेचे मोफत बुंदीप्रसाद पाकिटे तयार करण्यात आलेली आहेत.
तीन दिवसांच्या उत्सवकाळात विविध कार्यक्रम
तीन दिवस चालणाऱया उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या प्रथम दिवशी (बुधवार दि. 17) दुपारी 4.00 वाजता ह.भ.प. विवेक गोखले, नृसिंहवाडी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, रात्री 7.30 ते 10.30 यावेळेत प्रसाद कांबळी, मुंबई प्रस्तुत ‘देवबाभळी’ हा नाटकाचा कार्यक्रम होणार आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी (गुरुवार दि. 18) सकाळी 10 वाजता ह.भ.प. विवेक गोखले यांचा कीर्तनाचा कार्यक्रम व रात्री 7.30 ते 10.30 यावेळेत महेश काळे व राहुल देशपांडे यांचा भजन संध्या हा कार्यक्रम होणार आहे. उत्सवाच्या सांगतादिनी (शुक्रवार दि. 19) सकाळी 10 वाजता ह.भ.प. विवेक गोखले यांचे काल्याचे कीर्तन, तर रात्री 7.30 ते 10 या वेळेत सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भजन संध्या कार्यक्रम होणार आहे. उत्सवकाळात कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिराचे शेजारील स्टेजवर आणि निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर होणार आहेत.


























































