#MeToo अकबर यांच्यामागे 97 वकिलांची फौज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

परराष्ट्र राज्यमंत्री यांनी अखेर कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. प्रिया रमानी यांच्या विरोधात अकबर यांनी आज अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. समाजातील माझी प्रतिमा जाणूनबुजून खराब करण्यासाठीच रचलेले हे कुभांड असल्याचा दावा अकबर यांनी केला. अकबर यांच्या बचावासाठी, त्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी तब्बल 97 वकिलांची फौज सज्ज झाली आहे.

करंजवाला आणि कंपनी ही लॉ फर्म कोर्टात अकबर यांचा खटला लढणार आहे. या फर्ममधील 97 वकील अकबर यांच्यावरील आरोपांचा अभ्यास करत आहेत. मात्र या 97 पैकी केवळ सहाच वकील कोर्टात अकबर यांची बाजू मांडतील असे सांगण्यात आले. दरम्यान, अकबर यांना जे म्हणायचे होते ते त्यांनी सांगितले आहे असे सांगून भाजपने अकबर यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी फेटाळून लावली आहे, तर आपण कुठल्याही लढाईला तयार आहोत असे प्रिया रमानी यांनी म्हटले आहे.

97 वकील अकबर यांच्यावरील आरोपांचा अभ्यास करत आहेत. मात्र या 97 पैकी केवळ सहाच वकील कोर्टात अकबर यांची बाजू मांडतील.

आलोकनाथ यांचा फक्त1 रुपयाचा दावा

लेखिका, दिग्दर्शिका विन्ता नंदा यांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाविरोधात अभिनेता आलोकनाथ यांनी आज दिंडोशी सत्र न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. विशेष म्हणजे आलोकनाथ यांनी दाखल केलेला हा दावा कोटय़वधी रुपयांचा नसून फक्त एक रुपयाचा आहे.

स्टंट डायरेक्टर आणि अभिनेता विक्की कौशल याचे वडील श्याम कौशल यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे.

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावर आरोप केल्यानंतर दुआ यांची मुलगी मल्लिका हिने, ही वडिलांची लढाई आहे आणि तेच लढतील असे स्पष्ट केले आहे.

इंडियन फिल्म ऍण्ड डायरेक्टर्स असोसिएशनने दिग्दर्शक साजीद खानला नोटीस पाठवली.