आमदार तुकाराम काते यांच्यावर हल्ला करणाऱ्या चार आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मेट्रो कारशेड प्रकल्पात विविध कामांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा अशी मागणी करीत आंदोलन करणारे शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर गेल्या गुरुवारच्या रात्री जीवघेणा हल्ला करून पसार झालेल्या हल्लेखोरांपैकी चौघांना ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र काते यांच्यावर तलवार उगारणारा व या गुह्याचा मास्टर माईंड महेश लोंढे व त्याचे अन्य काही सहकारी अद्याप फरारी आहेत.

12 ऑक्टोबरच्या रात्री अणुशक्ती विधानसभा क्षेत्राचे आमदार तुकाराम काते महाराष्ट्र नगरातील स्वधर्म दुर्गामाता मंडळाला भेट देण्यासाठी गेले होते. तेव्हा तेथील त्रिमुर्ती इमारतीच्या गेटमधून पाच ते सहा तरुण हातात तलवार, चॉपर, हॉकी घेऊन काते यांच्यावर हल्ला करायला आले होते. त्यापैकी महेश लोंढे याने काते यांच्यावर तलवार देखील उगारली होती. पण त्यावेळी युवासेनेचे उपविभाग अधिकारी किरण सावंत याने ती तलवार वरच्यावर पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. याप्रकरणी सावंत याने दिलेल्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यात येत होता. अखेर पोलिसांनी सचिन खंडागळे (31), मंगेश सावंत (26), विशाल खंदारे (24), सुरज उर्फ सटकु कारके (25) यांना अटक केली आहे. या आरोपींनी गुह्यात वापरलेली दोन चारचाकी गाड्या, एक दुचाकी, एक तलवार जप्त करण्यात आली आहे. पोलीस महेश लोंढे व त्याच्या अन्य फरार साथीदांराचा शोध घेत आहेत.