
सामना प्रतिनिधी । पाथर्डी
तालुक्यातील लोहसर खांडगाव येथील श्री काळ भैरवनाथ मंदिरातील मुर्त्यांचे चांदीचे मुखवटे आणि रोख रकमेसह जवळपास पाच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. या घटनेने लोहसर खांडगाव परिसरात खळबळ उडाली आहे. नवरात्र काळात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. मंगळवारी रात्री उशीरा मंदिर बंद करण्यात आले. बुधवारी पहाटे पुजाऱ्याने मंदिर उघडले असता मूर्तीचे दोन चांदीचे मुखवटे,सोन्याचे डोळे आणि दोन दानपेट्या फोडून त्यातील रक्कम चोरीस गेल्याचे आढळले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने नगरहून श्वान पथकाला पाचारण केले. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरट्यांचे फावले. दरोडा टाकण्यापूर्वी चोरटयांनी मंदिर व परिसराची पूर्ण माहिती घेतली होती. पोलिसांनी तीन लाख तीस हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची तसेच घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.































































