डॉ. नितीन जोशी यांनी केली स्वतःवरच इंडोस्कोपी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

स्वतःवरच इंडोस्कोपी करण्याचा अफलातून प्रयोग डॉ. नितीन जोशी यांनी बुधवारी यशस्वी केला. अनेक डॉक्टरांनी या प्रयोगाला विरोध केला असूनही कुणाचीही मदत न घेता पाच मिनिटे बारा सेंकदात त्यांनी स्वतःची इंडोस्कोपी केली. देशातील हा पहिलाच प्रयोग असून यापूर्वी जपान आणि कोरियामध्ये असे प्रयोग झाले होते. इंडोस्कोपी करताना आपल्या रुग्णांना काय वेदना होतात याची जाणिव यानिमित्ताने झाल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.

भूल देवून एंडोस्कोपी करणे हे सर्वसामान्य रुग्णांना परवडत नाही. अनेक ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या आर्थिक खर्चामुळे एंडोस्कोपी टाळतात. त्यामुळे डॉ.नितीन जोशी यांनी अनेक रुग्णांना भूल न देताही एंडोस्कोपी केली आहे. आजपर्यंत त्यांनी नऊ हजार एंडोस्कोपी अनेक रुग्णांवर केल्या आहेत. त्यातील बऱ्याच एंडोस्कोपी त्यांनी भूल न देता केल्या आहेत. हे होत असताना रुग्णाला झालेल्या वेदना किती भयावह असतात,याचा अनुभवही त्यांना या प्रयोगातून घेतला. डॉ. जोशी यांनी सांगितले की, रात्री मी रोजच्या प्रमाणे जेवण केले आणि रात्रीच निश्चय केला की सकाळी आपली एंडोस्कोपी आपणच करायची. याबद्दल आपल्या दोन-तीन वरिष्ठ मित्रांनाही कळविले. त्यावर त्यांनी असे करणे अयोग्य असून हे करत असताना आम्ही सोबत असू, असे सांगत याला विरोध केला. सकाळी काहीही न खाता डॉ. जोशी आपल्या गॅलेक्सी रुग्णालयात आले. केस पेपर तयार करुन त्यावर स्वतःच सही केली. त्यानंतर एंडोस्कोपीला सुरुवात केली. एंडोस्कोपी करताना त्यांनी स्वतःच सर्व बटने ऑपरेट केली. त्यासाठी जो संयम आणि अभ्यास लागतो त्याचाही त्यांनी सराव केला. पहिल्या दोनवेळा त्यांना त्रास झाला. मात्र, नंतर सर्व प्रक्रिया त्यांनी सुरळीत केली. या पूर्ण प्रक्रियेसाठी त्यांना पाच मिनिटे बारा सेकंद एवढा वेळ लागला. त्यांचे जठर ठणठणीत असल्याचा अहवाल संगणकाने दिला. रुग्णांना होणारा त्रास तसेच त्यांना होणाऱ्या वेदना काय असतात ते यामुळे आपल्याला समजल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.