
अमित घोडेकर,[email protected]
26 नोव्हेंबरला मुंबई दहशतवादी हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण होतील, गेल्या काही वर्षांत या हल्ल्याचा बराचसा तपास अनेक देशी-विदेशी संस्थांनी केला आणि त्यातून पुढे अनेक गोष्टी समोर आल्या. गेल्या काही दिवसांपासून या हल्ल्याची आणखीन एक बाजू प्रकाशात आली ती म्हणजे ‘26/11’चं सायबर कनेक्शन. आजपर्यंत तपास यंत्रणा फक्त अतिरेक्यांची पार्श्वभूमी तपासून बघत होत्या, पण आता आलेल्या नवीन माहितीने सर्व तपास यंत्रणा चक्रावून गेल्या आहेत. ‘26/11’ चा मुंबईवर हल्ला करण्यासाठी अतिरेक्यांनी तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणात केलेला वापर हा भविष्यात अतिरेकी कशा प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून मोठय़ा प्रमाणात जीवितहानी करू शकतात हे सहज सिद्ध होते.
गेल्या आठवडय़ात आपल्या लष्करातील एका महत्त्वाच्या व्यक्तीला हनी ट्रॅप (मायाजालात) करून एका परदेशी महिलेने आपल्याकडची बरीच गोपनीयं माहिती चोरी केली. अशा प्रकारे अगदी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून ही माहिती चोरी केली गेली. थोडंसं मागे वळून बघितलं तर 10 वर्षे अगोदरच अतिरेक्यांनी अनेक प्रकारचे सायबर वॉर मार्ग अवलंबिले होते.
झरार शाह हा लष्कर-ए-तोयबाचा आयटी प्रमुख म्हणून काम करत होता. संगणकीय ज्ञानात तरबेज असलेला झरार शाह लष्करे तोयबाच्या सर्व अतिरेकी कारवाया संगणक आणि इंटरनेटचा वापर करून चालवत होता. जगातील अनेक अतिरेक्यांशी संधान साधने त्यांना कोणत्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करणे त्याची सगळी माहिती तसेच गुगल अर्थसारखे सॉफ्टवेअर वापरून त्या ठिकाणाची माहिती दाखवणे, उपग्रहाचा वापर करून अतिरेक्यांशी दळणवळण यंत्रणा प्रस्थापित करणे अशी अनेक कामे झरार शाह हा लष्कर-ए-तोयबासाठी करत असे.
अमेरिका तसेच ब्रिटन आणि अनेक देशांतील सुरक्षा यंत्रणांना झरार शाहच्या अतिरेकी कारवायाबद्दल माहिती होती. अमेरिकन तसेच ब्रिटिश सुरक्षा यंत्रणा झरार शाहच्या प्रत्येक गोष्टीवर मुंबई हल्ल्याच्या अगोदर लक्ष ठेवून होते. त्याचे प्रत्येक ई-मेल तसेच फोन कॉल्स हे अमेरिकन तसेच ब्रिटिश गुप्तचर यंत्रणा तपासात होती. मुंबई हल्ल्याच्या अगोदर जगभरातील अनेक सुरक्षा यंत्रणांना झरार शाह आणि लष्कर-ए- तोयबा काहीतरी अघटीत असे मोठे करणार याची खात्री पटली होती, परंतु सुरक्षा यंत्रणांना चकवत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून झरार शाह आणि लष्कर-ए-तोयबानी मुंबईवर हल्ला चढवला. हा हल्ला झाल्यावर मात्र सर्व सुरक्षा यंत्रणांना त्यांच्याकडील अगोदर मिळालेल्या माहितीचा वापर करून बऱयाच गोष्टीचा सुगावा लागला मग ही सर्व माहिती हिंदुस्थानी गुप्तचर यंत्रणेकडे पाठवण्यात आली, परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता आणि जगातील दहशतवादाचे एक मोठे संकट मुंबईवर ओढवले ज्यात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला.
इंटरनेट फोन आणि सॅटेलाईट फोनचा अवैधरीत्या वापर करून जगातील अनेक सुरक्षा यंत्रांना कोणताही सुगावा न लागता ‘26/11’ सारखा मोठा दहशतवादी हल्ला कसा केला जाऊ शकतो हे अतिरेक्यांनी दाखवून दिलं. तरीही अजूनही हिंदुस्थानात सायबर सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणांनी कोणते नवीन पाऊल उचलले हे अजूनही खूप मोठे कोडे आहे आणि गेल्या आठवडय़ात झालेल्या घटनेने अतिरेकी कसे सहजपणे आपल्याकडच्या संस्थांना सायबर मायाजालाचा आधार घेऊन चकवू शकतात हे दाखवून दिले आहे. त्यामुळे भविष्यातील युद्ध हे सायबर युद्ध असेल आणि त्याच्याशी लढण्यासाठी गरज आहे सायबर आर्मीची.























































