गीता कुराणापेक्षा संविधान मार्गदर्शक- मुख्यमंत्री फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना । प्रतिनिधी नागपूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान जगात सर्वोत्तम आहे. राज्य कारभार करताना अनेकदा पेचप्रसंग उद्धवतात. अशावेळी गीता, बायबल आणि कुराणापेक्षाही संविधान मार्गदर्शक ठरते, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. दीक्षाभूमीवर आयोजित ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई होते.

डॉ. आंबेडकरांचा विचार शालेय जीवनापासून रूजावा यासाठी आजपर्यत राज्यातील ३२ हजार शाळांमध्ये संविधानिक मूल्य शिक्षण सुरू केले आहे. मुंबई येथील इंदुमीलची जागा आंबेडकर स्मारकासाठी दिली. तसेच सामाजिक न्याय विभागातर्फे ६५ नवीन वसतिगृहांचे बांधकाम केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी देशातील बुद्धिस्ट सर्कलसाठी १० हजार कोटी रूपये खर्च करण्यात येत असल्याचे सांगितले. यातील सुमारे ५ हजार कोटींच्या सिमेंट रस्त्यांची कामे ५० टक्के पूर्ण झाली आहेत. तर उर्वरीत कामे येत्या दोन वर्षात पूर्ण होतील, अशी माहिती गडकरींनी दिली. बुद्धिस्ट सर्किट, धर्मयात्रा सर्किट व विस्तारित धर्मयात्रा सर्किट अशा तीन टप्प्यांमध्ये कामे पूर्ण करण्यात येत असल्याचे गडकरी म्हणाले. दहशतवाद आणि नक्षलवादाने उच्छाद मांडलेला आहे. अशा स्थितीत गौतम बुद्धांच्या विचारांची गरज असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्र सरकार संविधान कदापि बदलणार नाही, असे सांगितले. अॅट्रॉसिटी कायद्यामुळे सवर्णांनी नाराज होण्याचे कारण नाही. अकारण कोणताही दलित सवर्णावर खटला दाखल करणार नाही. पण सवर्णानींही समजूतीने आणि शांततेने घेतले पाहिजे. म्हणजे तक्रारीला जागाच राहाणार नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले.