
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नाथन लायन याने कसोटी क्रिकेटमध्ये एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. लायनने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 20 हजारपेक्षा जास्त चेंडू (जवळपास 3,300 पेक्षा जास्त षटकं) फेकले असून यामध्ये एकही नो बॉल नाही. कसोटीमध्ये एकदाही त्याचा पाय रेषेबाहेर पडलेला नाही. पाकिस्तानिरुद्ध सुरू असलेल्या कसोटीमध्ये लायनने हा विक्रम केला आहे.
पाकिस्तानविरुद्ध दुबईमध्ये सुरू असलेल्या कसोटीमध्ये फिरकीपटू लायनने हा अनोखा विक्रम नोंदवला आहे. यामागे त्याचे कठोर परिश्रम असल्याचे दिसून येते. विशेषत: आंतरराष्ट्रीक क्रिकेटमध्ये फिरकीपटू खूप कमीवेळा नो बॉल टाकताना आढळतात. कारण वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत त्यांचा रनअप छोटा असतो. परंतु सलग 20 हजार चेंडू फेकताना एकदाही रेषेबाहेर पाय न जाऊ देणे हा विक्रम आहे.
जॉन्सन आणि ब्रेट ली याला केले ओव्हरटेक
ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत आता नाथन लायन चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने मिशेल जॉन्सन (313 बळी) आणि ब्रेट ली (310 बळी) या दोन वेगवान गोलंदाजांना ओव्हरटेक केले आहे. पाकिस्तानविरुद्ध कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने हा पल्ला गाठला. लायनच्या पुढे सध्या वॉर्न, मेग्राथ आणि लिली यांचा नंबर आहे. वॉर्नच्या नावावर 708, मेकग्राथच्या नावावर 563 आणि लिलीच्या नावावर 355 बळी मिळवलेले आहेत.



























































