
सामना प्रतिनिधी । बीड
घटस्थापना ते विजयादशमी दरम्यान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. देशभक्ती व हिंदुस्थानी संस्कृतीची जाणीव तरुणांमध्ये करणे या उद्देशाने संभाजी भिडे गुरुजींनी सांगली येथे श्री दुर्गामाता दौडची सुरुवात केली. आता ही दौड संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित केली जात आहे.
यामध्ये बीडसह, परळी, केज या शहरात दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय,धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय, भारतमाता दुर्गामाता एक है, वंदे मातरम, अशा घोषणा आणि प्रेरणादायी पद्ये आणि पोवाडे म्हणत तरुण,लहानथोर तसेच महिलांनीही यात सहभाग नोंदविला.
बीड येथील साठे चौकातून हि दौड ध्येय मंत्र घेऊन सुरू करण्यात आली. पुढे पेठ बीड, मोंढा मार्गे खंडेश्वरी मंदिरात समारोप झाला. परळी येथेही दसऱ्याला दौडीचे आयोजन करण्यात आले होते. स्वराज चौक चाळीसफुटी रोडवरून संत सावतामाळी मंदिर, राणी लक्ष्मीबाई टॉवर, अग्रवाल लॉज, स्टेशन रोड येथून छत्रपती शिवाजी चौक येथे या दौडीची सांगता झाली. यानंतर गडकोट संवर्धन आणि बत्तीस मण सिंहासन याची माहिती देण्यात आली.
जानेवारीत गडकोट मोहिमेचे आयोजन
प्रतिवर्षी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान तर्फे आयोजित करण्यात येणारी गडकोट मोहिम यंदा किल्ले प्रतापगड ते किल्ले रसाळगड या ठिकाणी असणार आहे. जानेवारी महिन्यात ही मोहीम असून या मोहिमेची तारिख लवकरच घोषित करण्यात येईल, अशी माहिती प्रतिष्ठान तर्फे देण्यात आली आहे.



























































