लिंबोनी शिवारात बिबट्याने पाडला वासराचा फडशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
leopard

सामना प्रतिनिधी । तीर्थपुरी

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील लिंबोनी येथील राधेशाम काळे यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला उसाच्या शेतात फरफटत नेऊन फडशा पाडल्याची घटना घडल्याने शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांत भीतीचे सावट पसरले आहे.

राधेश्याम यांच्या शेतातील गोठ्यात दोन वासरासह एक गाय बांधलेली होती. त्यातील एका वासराला ठार करून दुसऱ्या वासराला किरकोळ जखमी करून सोडले तर भीतीने गाय दोर तोडून पळून गेली होती. दुसऱ्या दिवशी ती आढळून आल्याचे काळे यांनी सांगितले. वनविभागाला घटनेची माहिती दिली असता वनपाल राठोड, पशुसंवर्धन अधिकारी के.बी.जनकवाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान राधेश्याम काळे हे रात्री १२ वाजेच्या सुमारास शेतात गेले असता त्यांना बिबट्या व त्याचा एक बछडा मृत वासराला उसाच्या शेतात फरफटत घेऊन जातांना दिसले होते. त्यांनी गावात येऊन ग्रामस्थांना याची माहिती देऊन शेतात राहणाऱ्या इतर ग्रामस्थांना सावध केले. दरम्यान
बुधवारी संध्याकाळी रामसगाव शिवारात आढळलेला तो बिबट्या हाच असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.