
सामना प्रतिनिधी । नागपूर
आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी विनापरवानगी आमदार निवासावर चढून आंदोलन करणाऱ्या आमदार बच्चू कडू यांच्यासह गोसेखुर्द प्रकल्पातील एक हजार महिला व पुरूषांवर शनिवारी सीताबर्डी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 ते 20 ऑक्टोबरदरम्यान आरोपी आमदार बच्चू कडू, बाळकृष्ण जुवार, यशवंत टिचकुले, अरूण हटवार, राजेद्र वाघ, मंगेश वंजारी, रमेश कारेमोरे, भाऊ कातोरे, रूपेश कातोरे, रूपेश आतीलकर (सर्व रा. भंडारा) यांच्यासोबत गोसेखुर्द प्रकल्पातील 800 ते एक हजार महिला व पुरूष प्रकल्पग्रस्तांनी विनापरवाना सीताबर्डी हद्यीत आमदार निवास इमारत क्र. 1 व 2 सिव्हील लाईन, नागपूर येथे जमा होवून आमदार निवास इमारतीवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण केले. तसेच आमदार निवासमधील वास्तव्याला असलेल्या इतर लोकांच्या जिवीतास धोका उत्पन्न केला. याशिवाय बंदोबंस्तावरील पोलीसांच्या दिशेने दगडफेक करून तसेच पाण्याची बाटल्या खाली फेकल्या. आमदार निवासातील शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आरोपींविरूध्द कलम 143,147,149,336,427 आणि सहकलम 3 सार्वजनीक मालमत्तेचे नुकसानअन्वये गुन्हा नोंदविला आहे.
























































