
सामना प्रतिनिधी । मुंबई
अंधेरी परिसरातील प्रसिद्ध उपाहारगृहांतील अनधिकृत बांधकामांवर पालिकेने धडक कारवाई केली आहे. इंडिपेंडट ब्रेवरीज, स्पेस बार, लिटल डोअर, कॅलिडो, र्ब्य्रूबॉट, ऑटम, ग्लोकल जंक्शन अशा तब्बल 11 उपाहारगृहांवर ही कारवाई करण्यात आली.
कमला मिलमध्ये गेल्या वर्षी आग लागून झालेल्या दुर्घटनेनंतर पालिकेने उपाहारगृहांमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका लावला होता. मधल्या काळात ही मोहीम काहीशी थंडावली असताना आता पुन्हा एकदा अंधेरीत या मोहिमेने जोर धरला आहे. आतापर्यंत या उपाहारगृहांमधील एकूण 15 हजार चौरस फुटांपेक्षा अधिक बांधकाम तोडण्यात आले आहे. यामध्ये इंडिपेंडट ब्रेवरीज, स्पेस बार, लिटल डोअर, कॅलिडो, र्ब्य्रूबॉट, ऑटम, ग्लोकल जंक्शन, बी देसी, बियॉण्ड बार, राईक टेरेस बार व बार्बेक्यू नेशन या उपाहारगृहांचा समावेश आहे. परिमंडळ – 4 चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. उपाहारगृहांमध्ये काही जागा मोकळी सोडणे आवश्यक असताना त्यातही अनेक ठिकाणी अनधिकृतपणे बांधकाम केले होते. या मोकळ्या जागेवरील बांधकामे तोडण्यात आली आहेत, अशी माहिती ‘के पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.
जुहू, जोगेश्वरी (प.), अंधेरी (प.), विलेपार्ले (प.), जुहू समुद्रकिनारा, ओशिवरा, वर्सोवा व वर्सोवा समुद्रकिनारा या उच्चभ्रू समजल्या जाणार्या विभागातील प्रतिष्ठत उपाहारगृहांवरही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी पोलीस दलाचेही सहकार्य घेण्यात आले होते. या कारवाईकरिता 25 पोलिसांचा ताफा संबंधित घटनास्थळी तैनात असून या कारवाईत महापालिकेचे 20 कामगार-कर्मचारी, अधिकारीदेखील सहभागी झाले आहेत. या कारवाईसाठी 1 जेसीबी, 2 ‘लॉरी’ वाहने, गॅसकटर, हातोडे, घण व इतर आवश्यक साधनसामुग्री वापरण्यात येत असून अनधिकृत बांधकामांवरील ही धडक कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे, अशीही माहिती प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

























































