
सामना प्रतिनिधी। हिंगोली
सेनगाव तालूक्यातील सिनगी नागा येथील शेतकऱ्याने सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून रविवारी गळफास लावून आत्महत्या केली. . याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी हिंगोली जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. भगवान अश्रुजी माने (50) असे त्यांचे नाव आहे. दरम्यान शनिवारीही एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली होती . यामुळे २४ तासात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने हिंगोलीत खळबळ उडाली आहे.
सेनगाव तालुक्यातील सनिगी नागा येथे राहणारे भगवान यांच्याकडे ५ एकर शेतजमीन आहे. पण या शेतीमधून कोणतेच उत्पन्न निघत नव्हते. त्यातच त्यांनी दुष्काळी परिस्थितीमुळे वाशीम येथील एचडीएफसी बँकेचे साडे सात लाख रुपये कर्ज घेतले होते. पण शेतातून उत्पन्नच मिळत नसल्याने हे कर्ज फेडावे कसे हा प्रश्न त्यांना पडला होता. या विवंचनेतूनच भगवान यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती सेनगाव पोलिसांना समजताच त्यांनी सिनगी नागा येथे जाऊन घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर सेनगाव येथील रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या स्वाधीन मृतदेह करण्यात आला. दरम्यान, औंढा नागनाथ तालुक्यातील येडुद येथील दामोदर घुगे या शेतकऱ्यानेही २० ऑक्टोबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने जिल्हा हादरुन गेला आहे.






























































