
सामना प्रतिनिधी । मुंबई
ओला, उबेर चालकांनी आज दुपारपासून संप सुरू केल्याने मुंबईकरांचे हाल सुरू झाले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर भडकल्याने आपल्या उत्पन्नात वाढ करावी म्हणून ओला-उबेर चालकांच्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ या संघटनेने हा बेमुदत संप पुकारला आहे.
ओला, उबेर या कंपन्या प्रवाशांकडून घेतलेल्या भाडय़ातील मोठी रक्कम आपल्या घशात घालत असून चालकांची बोळवण केली जात आहे. पहाटेच्यावेळी कॅबची संख्या कमी असते, पण त्याचवेळी कंपन्या प्रवाशांकडून तिप्पट भाडे आकारतात. मात्र त्याचा चालकांना कोणताच फायदा होत नाही. पेट्रोल- डिझेलचे दर वाढलेले असतानाही उबेर कंपनीने भाडे दर कमी केला आहे. त्याचा परिणाम चालकांच्या उत्पन्नावर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर चालकांचे उत्पन्न वाढवावे ही प्रमुख मागणी आहे. मात्र त्याकडे व्यवस्थापन दुर्लक्ष करत असल्यानेच संपाचे हत्यार उपसल्याचे संघटनेचे सचिव सुनील बोरकर यांनी सांगितले.
दिवसाला तीन हजार रुपये धंदा व्हावा
प्रत्येक कॅब चालकाचा दिवसाला तीन हजार रुपये धंदा झाला तरच त्यांना परवडणार आहे. त्यासाठी एस हॅचबॅक कॅबसाठी प्रति किलोमीटर 16 रुपये, एस सेडन कॅबसाठी प्रति किलोमीटरला 18 रुपये तर एसी एसयूव्ही कारसाठी पहिल्या चार किलोमीटरला 100 ते 150 रुपये भाडे दर निश्चित करण्याची मागणी चालकांनी केली आहे.























































