LIVE- दिवाळीत फक्त २ तास फटाके फोडण्यास परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

दिवाळी तोंडावर आलेली असताना फटाक्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी रात्री फक्त २ तासांची परवानगी दिली आहे. रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडावेत असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. न्यायालयाने फटाक्यांच्या विक्रीवर सरसकट निर्बंध घातले नाहीयेत मात्र ऑनलाईन विक्रीवर पूर्ण बंदी घातली आहे. फटाके विकणाऱ्यांना परवाना घ्यावा लागेल, परवाना असलेले विक्रेतेच फटाके विकू शकतील असं आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे. सर्व राज्यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळांना आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिवाळीच्या सात दिवस आधीपासून आणि सात दिवसानंतर हवेची गुणवत्ता तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

फटाके फोडण्यावर बंदी घालावी की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.के.सिक्री आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने २८ ऑगस्ट रोजी त्यांचा निर्णय राखून ठेवला होता. फटाके विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न जसा महत्वाचा आहे तसाच देशातील जनतेच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा प्रश्नही महत्वाचा आहे. या महत्वाच्या मुद्दांना लक्षात ठेवत हा आदेश देण्यात आला आहे.

  • फटाक्यांच्या विक्रीवर सरसकट बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
  • फटाक्यांची ऑनलाईन विक्री करता येणार नाही