दिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावरच येत्या सोमवारपासूनच पुण्यामध्ये एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराचा पूर्व भाग वगळता संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये बदल करण्यात आला असून केवळ पाच तासच पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती. सर्वपक्षीय गटनेते, आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, पाणी पुरवठ्याचे अधिक्षक अभियंता प्रविण गेडाम उपस्थित होते. या बैठकीमध्ये दिवाळी नंतर नाही तर येत्या सोमवारपासून पुणे शहरामध्ये दररोज पाच तास पाणीपुरावठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरामध्ये पाणी पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी येत आहेत. कालवा फुटी आणि महापालिकेचे पंप बंद केल्यानंतर तक्रारींमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे पुणे शहराच्या पाणी पुरवठ्याचे संपुर्ण नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासन आणि सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा केल्यानंतर संपूर्ण शहराला पुरेशा दाबाने पाच तास पाणी देण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.

शहराच्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी लक्षात घेता. समान पाणीपुरवठा करण्यासाठी झोनमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता सर्व भागात एकाच वेळा पाणी सोडण्यात येणार नाही.पुर्ण शहरात सध्या पाणी पुरवठ्याच्या वेगवेगळ्या वेळा आहेत. सर्व भागाला पाणी मिळावे यासाठी प्रशासनाने झोन करुन पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने वेळापत्रक तयार केले असून सोमवार पासून याची अंमलबजावणी होणार आहे. लष्कर पाणी पुरवठा केंद्रापर्यंत 15 नोव्हेंबर पर्यंत पाईप लाईनचे काम पुर्ण करण्यात येईल. यानंतर 100 ते 150 एमएलडी पाण्याची बचत होणार असल्यामुळे शहराला पाणी कमी पडणार नाही असे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

सत्ताधारी मूग गिळून गप्प
शहराला जलसंपदा विभागाकडून किती पाणी मिळणार हे काही प्रशासन आणि सत्ताधारी सांगायला तयार नाहीत. पुणेकरांना समान पाणी मिळणार असल्याचे केवळ सांगण्यात येत आहे. वास्तविक कालवा समितीच्या बैठकीमध्ये 1150 एलएमडी पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. जलसंपदा विभागाकडून 1150 एमएलडीच पाणी मिळणार आहे. त्यामुळे सध्या 1350 एमएलडी पाण्यात सरळपणे कपात होणार असली तरी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी यावर काहीच बोलायला तयार नाहीत. सत्ताधारी आणि पालकमंत्री गिरीश बापट हे मूग गिळून गप्प आहेत.

पश्चिम पुण्याच्या पाणीपुरवठ्यात मोठी कपात
शहरामध्ये एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा सर्वाधिक फटका पश्चिम पुण्याला बसणार आहे. शहरातीलस सर्व पेठांच्या पाणी पुरवठ्यात मोठी कपात करण्यात आली आहे. काही ठिकाणी पाच तास तर काही ठिकाणी तीनच तास पाणी मिळणार आहे. त्यामुळे मध्य पुण्यात पाणीच्या प्रचंड समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. शहराच्या पूर्व भागाला सध्या एक ते दीड तास पाणी मिळते असे असताना या भागाच्या पाण्याच्या वेळेत कोणतीच कपात करण्यात आली नाही.

भाजपने केले पुणेकरांची फसवणूक
सत्ताधाऱ्यांना पाण्याचे नियोजन जमत नाही. धरणांमध्ये 26 टीएमसी पाणी असताना पुणेकरांच्या पाण्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणेकरांना पाणी मिळाले पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगितले पाहिजे. कालवा समितीच्या बैठकीनंतर पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांची आणि पुणेकरांची सुध्दा भाजप फसवणूक करत असल्याची टिका विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी केली.

24 तास पाणी पुरवठा कसा करणार?
पुणे शहराला केवळ एक वेळ पाणी पुरवठा होणार आहे. आताच ही परिस्थती आहे. मग शहराला 24 तास पाणी पुरवठा कसा करणार असा सवाल माजी स्थायी समितीचे अध्यक्ष शिवा मंत्री यांनी केला आहे. 24 तास पाणी पुरवठयाच्या निविदासाठी ही योजना मंजूर केली का असा खडा सवाल त्यांनी केला.

पाण्याचे वेळापत्रक –
शहरातील बहुतांशी पेठा – सकाळी 5 ते 9
मार्केट यार्ड बिबवेवाडी परिसर – सकाळी 5 ते 9
अप्पर इंदिरा नगर आणि परिसर – दुपारी 12 ते 4
सहकारनगर – दुपारी 4 ते 9
दांडेकर पुल, भवानी आणि नाना पेठ – सकाळी 5 ते 9
शिवाजीनगर, चतृश्रृंगी – सकाळी 5 ते 8.30
शहराचा पूर्व भाग – वेळेत बदल नाही