
सामना प्रतिनिधी । हिंगोली
सोन्याचे नाणे अर्ध्या किंमतीत देतो, अशी बतावणी करून पुणे येथील दोन जणांना बुधवारी बेदम मारहाण करत दीड लाख रुपये घेऊन कारने सुसाट वेगात पळ काढणाऱ्या एकाला सिनेस्टाईल पाठलाग करत आखाडा बाळापूर पोलीसांनी पकडले असून अन्य दोघांना ताब्यात घेण्यासाठी पथके रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी दिली आहे.
पुणे शहरात राहणाऱ्या अक्षय चंद्रकांत राजूरकर व विकास सोळंके या दोघांना काही भामट्यांनी सोन्याची नाणी अर्ध्या किमतीत देतो असे म्हणून हिंगोली ते नांदेड रस्त्यावरील वारंगा फाटा येथे बोलावले. ठरल्यानुसार बुधवारी दुपारी दोन वाजता सोळंके व राजूरकर हे वारंगा येथे पोहोचले. त्या ठिकाणी आल्यावर तीन भामट्यांनी मिळून या दोघांनाही बेदम मारहाण करत त्यांच्याजवळील दीड लाख रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर हे तिन्ही भामटे इंडिगो कारने सुसाट वेगात पसार झाले. वारंगा फाटा पोलीस चौकीच्या पोलिसांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात ही माहिती कळवली. सुसाट वेगात एक कार बोल्डा रस्त्यावर गेल्याचे समजल्यानंतर पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी पोलिस कर्मचार्यांसह पोलीस जीप घेऊन पाठलाग सुरू केला. दरम्यान वेगात असलेल्या कारला गाठून पोलिसांनी थांबविले. त्यावेळी कारमधील दोन जण पसार झाले. तर गजानन दादाराव चव्हाण (रा.धानोरा भुसे, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम) याला पोलिसांनी पकडले. चव्हाणला अटक करून इंडिगो कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याच्या अन्य साथीदारांच्या शोधासाठी दोन पथके रवाना केल्याचे पोलिसांनी सांगितले.































































