
सामना प्रतिनिधी, मुंबई
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असताना पालिकेने प्लॅस्टिक वापरणाऱ्यांविरोधात कारवाई तीव्र करणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामध्ये बड्या व्यावसायिकांसह गल्लीबोळामधील दुकानांवरही धाडी टाकण्यात येणार असून प्लॅस्टिक पिशव्या आढळल्यास परवाना रद्द केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुंबईत जोरदार कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडून आढावा आणि नियोजन सुरू आहे.
शिवसेना नेते–युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पर्यावरणाला घातक ठरणाऱया प्लॅस्टिकवर सरकारने 23 जूनपासून राज्यभरात बंदी लागू केली. यानंतर पालिकेने पहिल्या टप्प्यात दुकानदार आणि प्लॅस्टिकनिर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांवर धडक कारवाई सुरू आहे. प्रत्येक दिवशी शेकडो दुकानांवर धाडी टाकून लाखो रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. तरीदेखील काही ठिकाणी अजूनही दुकानदार, फेरीवाले, किरकोळ विक्रेत्यांकडून प्लॅस्टिक पिशव्या वापरल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. याची गंभीर दखल घेत अलीकडेच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी यापुढे दुकानदारांकडे प्लॅस्टिक पिशव्या आढळल्यास परवाना रद्द करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पालिकेनेही दिवाळीत मोठय़ा प्रमाणावर प्लॅस्टिकचा वापर होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर कारवाई तीक्र करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दुकानदारांकडे प्लॅस्टिक आढळल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे.
प्लॅस्टिकविरोधी कारवाईसाठी पालिकेच्या मार्केट, परवाना आणि आस्थापना विभागातील कर्मचाऱयांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापराला कारणीभूत ठरणारे विक्रेते, व्यावसायिकांवर कारवाई करून प्लॅस्टिक पिशव्यांची उत्पत्तीस्थाने बंद करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.
summary- plastic ban will be more strict on diwali
























































