
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवणातील मुख्य रस्ते खड्डेमुक्त व सुस्थितीत ठेवण्यासाठी सुमारे सव्वा कोटीचा निधी आमदार वैभव नाईक यांच्या सततच्या पाठपुराव्याने मंजूर झाला आहे. तीन ठेकेदारांना ठेकाही देण्यात आला. मात्र दोन महिने उलटले तरी ठेकेदाराकडून कामास सुरवात झाली नाही. येत्या दोन दिवसात कामास सुरवात न झाल्यास अधिकाऱ्यांनाच कार्यालयात बसू देणार नाही, असा इशारा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिला आहे.
मालवण शहर व तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सार्वजनिक बांधकामाच्या कार्यालयात धडक दिली व अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी नगरसेविका सेजल परब, सुनीता जाधव, आकांक्षा शिरपुटे, नगरसेवक पंकज सादये, किसन मांजरेकर, गौरव वेर्लेकर, दीपा शिंदे, नंदा सारंग, प्रवीण लुडबे, अक्षय रेवंडकर, भार्गव खराडे, यशवंत गावकर आदी उपस्थित होते.
खड्डे बुजविण्याच्या कामास या वर्षात प्रथमच मोठ्या प्रमाणात निधी आला. मात्र अद्याप कामास सुरवात न झाल्याने विरोधकांकडून आमदार, पालकमंत्र्यांवर आरोप होत आहेत. प्रत्यक्षात याला सर्वस्वी ठेकेदार जबाबदार आहेत. ठेकेदार जर काम करत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे खोबरेकर यांनी बांधकाम अधिकारी प्रकाश चव्हाण यांना सांगितले. तसेच खड्डेमय रस्त्यांमुळे जनतेचा नाराजीचा सूर आमदारांबाबत दिसून येतो. प्रत्यक्षात आमदार कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणतात. मात्र ठेकेदारांच्या मनमानी कारभाराचा फटका जनतेच्या नाराजीचा रूपाने आमदारांना बसत आहे. तरी तात्काळ काम सुरू करा. अशी भूमिका खोबरेकर यांनी मांडली. काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका. येत्या दोन दिवसात कामास सुरुवात झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर व शहर प्रमुख बाबी जोगी यांनी मांडली.
ठेकेदारांना बजावल्या नोटिसा
संबंधित ठेकेदाराने काम न केल्यास त्याच्यावर प्रति दिन दोन हजार दंडात्मक कारवाई बरोबर त्याचे काम काढून घेतले जाईल अशी तरतुद आहे. त्या आशयाच्या नोटिसा ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. असे सार्वजनिक बांधकामचे अधिकारी प्रकाश चव्हाण यांनी सांगितले. तसेच लवकरच काम सुरू करून घेऊ असेही स्पष्ट केले.





























































