
>> सुवर्णा क्षेमकल्याणी
जगात अशक्य असं काहीच नाही आणि मनात आणलं तर तुम्ही निवृत्तीनंतरही तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करू शकता हे सिद्ध करणाऱया निरुपमा भावे यांचा उत्साह तरुणांनाही लाजवील असा. नुकताच त्यांनी पुणे ते कन्याकुमारी हा प्रवास सायकल परिक्रमा करीत पूर्ण केला. माणूस हा शरीराने कधीही थकत नसतो याची साक्ष देणाऱया निरुपमा भावे यांचा परिचय.
वय वाढल्यामुळे काही जण आपल्या दैनंदिन आयुष्यात बरेच बदल करतात. याउलट काही जणांच्या बाबतीत वय हा मुद्दा अगदीच नगण्य ठरतो. ते शरीराने जरी वयस्क झाले असले तरी मनाने मात्र तितकेच तरुण असतात. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याच्या निरुपमा भावे. निरुपमाताई पुणे विद्यापीठात गणित विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. गणित विषयाच्या हेड (मुख्य) म्हणून पुणे विद्यापीठातून त्या निवृत्त झाल्या. एकीकडे शिक्षक म्हणून काम सुरू असताना वयाच्या पन्नाशीनंतर त्यांना सायकलिंगचं पॅशन खुणावू लागलं. 10 किमीपासून झालेली ही सायकल प्रवासाची सुरुवात म्हणता म्हणता प्रति दिवस 100 किमीपर्यंत पोहोचली आणि त्यातूनच त्यांना स्वतःची एक वेगळी ओळख पटली. निरुपमा भावे यांचा गणिताच्या प्राध्यापिका ते सायकलिंगचा थक्क करणारा प्रवास जाणून घेताना आपल्यालाही एक सकारात्मक ऊर्जा मिळते.
निरुपमाताई लहानपणापासूनच गणित विषयात मुळातच हुशार असल्यामुळे त्यांना इंजिनीअरिंग करण्याची इच्छा होती, पण घरातून तशी परवानगी मिळाली नसली तरी गणित या विषयात पदवी घेतल्यावर पुढे इतक्यावर न थांबता पुढे एमएससी गणित, एमएससी (statastics), एम फिल (statastics), पीएचडी (गणित) असं उच्च शिक्षण त्यांनी घेतलं. हे सगळं सुरू असताना सायकलिंगची गोडी कशी काय निर्माण झाली असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं की, मी साधारण 52-54 वर्षांची असताना माझे एक मित्र घरी आले, जे त्यांच्या साठीमध्ये असतानाही रोज औंध ते वाडिया महाविद्यालयापर्यंतचा प्रवास सायकलने करायचे. त्यांनी त्यावेळी सायकलचं जे काही वर्णन, किंबहुना कौतुक केलं तेव्हा मला सायकल चालवण्याची प्रेरणा मिळाली. लागलीच माझ्या पुतणीची जुनी सायकल काढली आणि 2 किमी प्रवास झाला. एक आत्मविश्वास मिळाला आणि इथूनच सायकलिंगचा प्रवास सुरू झाला असं मी म्हणीन!
दरम्यान, वर्तमानपत्रात पुणे सायकल प्रतिष्ठान नावाची एक संस्था आहे, जी दर महिन्याच्या पहिल्या रविवारी पुण्याच्या एका भागात सायकल चालवून सायकलचं महत्त्व पटवून देत घोषणा देत जातात. या उपक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या इतर काही उपक्रमांविषयी जाणून घेताना दिवसा 100 किमी प्रवास करणारे काही सायकलस्वार भेटले. मग त्यांनी हळूहळू 10 किमी, 25 किमी असं करत स्वतःला आजमावून पाहिलं. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. भोर (120 किमी), वाघा बॉर्डर-आग्रा, गोवा-कोचीन, भुवनेश्वर-कलकत्ता, मनाली-लेह-खारदुल्ला, गुजरात-सौराष्ट्र, मध्य प्रदेश यांपैकी खारदुल्लाची (18,380 फूट) वैशिष्टय़पूर्ण सफर होती. एकूणच वेगवेगळ्या ठिकाणी निरुपमाताईंची सायकल सफर अगदी जोमात सुरू असताना एकदा त्यांच्या पायाला दुखापत झालेली असतानासुद्धा एका अनोख्या उपक्रमात त्यांना सहभागी होता आलं, ज्यात गर्भवती स्त्रियांसाठी शिबिरं घेण्यात आली.
गंगासागर-गोमुख वॉकेथॉन, एन्डय़ुरो-3 ही साहस स्पर्धा (रिव्हर क्रॉसिंग, रायफल शूटिंग, ट्रेकिंग, सायकलिंग) याशिवाय लोणावळा इथल्या घाटात तैलबैला इथल्या उभ्या कडय़ावर त्यांनी रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंगसारखे अतिशय जोखमीचे प्रकार यशस्वीपणे पूर्ण केले. निरुपमाताईंचा सुरळीत चाललेला हा सायकल प्रवास काही दिवसांसाठी थांबला होता. त्यांच्या मेंदूला सूज आल्यामुळे जवळपास 15 दिवस त्या बेशुद्धावस्थेत होत्या, पण इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी या आजारावरही मात केली. शिवाय त्यांच्या या सायकलिंगच्या प्रवासात त्यांना त्यांच्या पतीचाही पाठिंबा होताच. त्यामुळे काही दिवसांतच बापदेव घाटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांची सायकल सफर सुरू झाली. अशा या निरुपमाताईंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या सायकलप्रेमी समूहाने 16 दिवसांत (प्रति दिवस 100 किमी) पुणे ते कन्याकुमारी असा प्रवास पूर्ण केला आणि 3 जानेवारीला या साहसी कन्येचा 70 वा वाढदिवस मोठय़ा थाटात साजरा करण्यात आला.
माणूस हा शरीराने कधीही थकत नसतो याची निरुपमा भावे साक्ष देतात. जगात अशक्य असं काहीच नाही आणि मनात आणलं तर तुम्ही निवृत्तीनंतरही तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करू शकता हेच यातून सिद्ध होतं. निरुपमाताई अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. मानसिक, शारीरिक थकवा, आजारपण आपल्या इच्छांना मुरड घालूच शकत नाही हे निरुपमाताईंच्या निमित्ताने स्पष्ट होते.





























































