
सामना ऑनलाईन । लखनौ
सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. संत-महंतांनी आक्रमक धोरण घेत केंद्राने राम मंदिरासाठी अध्यादेश आणण्यासाठी दबाव टाकत आहेत. अशातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी मोठं वक्तव्य करत संत समाजाने धैर्य धरावं आणि न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी असा सल्ला दिला आहे.
… तर केंद्राने राम मंदिरासाठी अध्यादेश काढा, ओवैसींचे 56 इंची आव्हान
एका टीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगी आदित्यनाथ यांना सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी पुढे ढकलल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तसेच संत समाजाने यावरील दिेलेल्या प्रतिक्रियांवरही प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना योगी म्हणाले की, ‘हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयाने या प्रकरणावर लवकरच लवकर सुनावणी करावी. न्यायामध्ये कोणत्याही प्रकारचा उशिर होऊ नये. परंतु, याला पर्यायही शोधला जात आहे. न्यायालयाने लोकांच्या श्रद्धांचाही विचार करायला हवा.’
तसेच ते पुढे म्हणाले की, देशातील न्यायव्यवस्थेवर सर्वांनाच विश्वास आहे. परंतु न्याय मिळण्यास उशिर होत असल्याने निराशेचे वातावरण आहे. राम मंदिरासाठी जो योग्य पर्यात असेल तो अवलंबला पाहिजे. असे उत्तर देऊन त्यांनी संत समाजाकडून सुरू असलेल्या अध्यादेशाच्या मागणीला बगल देत न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहणे योग्य असल्याचे म्हटले.


























































