
सामना प्रतिनिधी । मुंबई
इंटरनेटवरील नोकरीसंबंधित वेबसाइटवरून नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या बेरोजगार तरुणांना फोन करून अथवा ई-मेल पाठवून नोकरीचे आमिष दाखवत त्यांना लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या दिल्लीतल्या चौघा भामट्यांना भांडुप पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नोकरीचे आमिष दाखवून रजिस्ट्रेशन, मुलाखत अशी विविध कारणे सांगत दिल्लीतल्या काही भामटय़ांनी पाच लाखांची फसवणूक केल्याची तक्रार राहुल रॉय या तरुणाने भांडुप पोलीस ठाण्यात केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण, उपनिरीक्षक वाघमोडे, हिरवे, अंमलदार घोसाळकर, पवार, बांगर, सांगळे, शेख, शेट्टी, आव्हाड आदींच्या पथकाने तपास सुरू केला. राहुलने ज्या एसबीआय बँकेच्या खात्यांमध्ये पैसे भरले होते. त्या खात्याची माहिती घेतली असता ते खाते दिल्लीत राहणाऱया परवीन रजपूत या तरुणाचे असल्याचे समजले. पोलिसांनी दिल्ली गाठून परवीनकडे चौकशी केली असता त्याचा मित्र अली व त्याच्या सहकाऱयांनी नोकरीचे आमिष दाखवत मला बँक खाते उघडायला लावले व ते स्वतः वापरण्यास सुरुवात केली होती असे परविनने सांगितल्यानंतर पोलिसांनी पुरकन अली मोहम्मद रिझवी (27), मनीष विनोद कुमार मेहरा (27), लालन पांडे (32) या तिघांना पकडले. त्यानंतर रंजन आणि सलमान यांचे नाव समोर आले. मग पोलिसांनी रंजितकुमार रंजन याला ही पकडले.
बोगस कॉल सेंटर खोलून फसवाफसवी
आरोपी ज्या टोळीत काम करतात त्यांच्या म्होरक्यांनी दिल्लीत बोगस कॉल सेंटर खोलले होते. ते भामटे अटक आरोपींच्या मदतीने नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना हेरायचे तसेच त्यांना विविध आमिषे दाखवून विविध कारणास्तव त्यांना वेळोवेळी ते सांगतील त्या बँक खात्यात पैसे भरायला लावायचे. गंभीर म्हणजे गुह्यासाठी वापरणारे बँक खातेदेखील ते गरजूंना त्यांच्या नावावर काढायला लावायचे. या गुह्यातील मुख्य आरोपी फरार असून भांडुप पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.



























































