जेएनपीटीच्या कामगारांचा निर्धार मेळावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

जेएनपीटी कामगार एकता संघाच्या वतीने बुधवार ता. 31 रोजी जेएनपीटी कामगारांचा निर्धार मेळावा आयोजित केला होता. या कामगार मेळाव्यासाठी जेएनपीटीचे शेकडो कामगार उपस्थित होते. या मेळाव्यात जेएनपीटीने चालविलेल्या खाजगीकरणाचा निषेध करून कोणत्याही परिस्थितीत जेएनपीटीत सुरू असलेल्या एका शिफ्टचे खाजगीकरण न होऊ देण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच जेएनपीटी मधील रिक्त (रिटायर्ड) झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर नवीन कामगारांची भरती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मेळाव्यात केंद्र सरकारने नुकतेच केलेल्या नवीन वेतन कराराच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले तसेच जेएनपीटी कामगारांसाठी सतत संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या जेएनपीटीचे विश्वस्त आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दिनेश पाटील यांचा कामगारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या मेळाव्याला कामगार एकता संघाचे अध्यक्ष दिनेश पाटील कामगार नेते आणि जेएनपीटी कामगार एकता संघाचे कायदेशिर सल्लागार एड जयप्रकाश सावंत, एड विजय पाटील, पंडीत घरत, गणेश घरत कामगार संघाचे पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.