
सामना ऑनलाईन,केवाडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी नर्मदा नदी पात्रात उभारण्यात आलेल्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळयाचे लोकार्पण केले. या लोकार्पण सोहोळ्याआधी गंगा, यमुना आणि नर्मदेसहीत देशातील 30 नद्यांच्या पवित्र जलाने सरदार पटेल यांच्या या भव्य पुतळ्याला 30 ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात जलाभिषेक करण्यात आला. लार्सन आणि टुब्रोने या भव्यदिव्य 597 फूट उंच लोहस्मारकाची उभारणी 33 महिन्यांत पूर्ण केली आहे. 1 नोव्हेंबरपासून पर्यटकांना हा पुतळा पाहाता येणार आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे वैशिष्टय़ म्हणजे सात कि.मी. अंतराहूनदेखील हा पुतळा दिसतो. हा पुतळा गुजरातमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी एक खास आकर्षण ठरणार आहे. त्या दृष्टीनं पर्यटकांसाठी काही विशेष सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवर या लोकार्पण सोहोळ्यासाठी मंचावर उपस्थित होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी उपमुख्यमंत्री नितीन पटेल, मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, भाजपाध्यक्ष अमित शाह या भाजप नेत्यांनी उपस्थिती लावली होती. भाजपचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांनी नवी दिल्लीतील कार्यक्रमात सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली.
पटेलांमध्ये कौटिल्याची कूटनीती आणि शिवाजी महाराजांचे शौर्य – पंतप्रधान
सरदार वल्लभभाई पटेलांमध्ये कौटिल्याची कूटनीती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य दिसून येते. पटेलांनी म्हटले होते की, देशात आपापसात होणाऱ्या भांडणांमुळे आपले नुकसान होत आहे. त्यामुळे आता आपल्याला आपापसांत लढायचे नाही. त्यांच्या या नीतीमुळेच सर्व संस्थाने खालसा झाली. त्यानंतर देश एक झाला. त्यासाठी सर्व राजांनी आपला त्यागही केला होता. त्यांच्या त्यागालाही आपल्याला विसरता येणार नाही, अशी भावना या लोकार्पण सोहोळ्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
पडला मराठी भाषेचा विसर
सरदार वल्लभभाई पटेल यांचे हिंदुस्थानी राजकारणातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या स्मारकाला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असे नाव देण्यात आले आहे. या भव्य पुतळय़ाखाली एका सफेद रंगाच्या पाटीवर देशी-विदेशी भाषांमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ लिहिले आहे. यात वेगवेगळय़ा हिंदुस्थानी भाषासुद्धा आहेत. पण या भाषांमध्ये मराठी भाषेला मात्र स्थान देण्यात आलेले नाही. या पुतळय़ाचे शिल्पकार महान कलाकार राम सुतार हे मराठी आहेत याचाही विसर गुजरात व केंद्र सरकारला पडला. वास्तविक महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन शेजारी राज्ये आहेत. पण गुजरात प्रशासनाला मराठी भाषेचा विसर पडल्याचे दिसत आहे. या पाटीवर एकूण दहा भाषा आहेत.
























































