मत्स्य व्यावसायिकांचा गोवा सरकारला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

गोवा राज्यात इन्सुलेट व्हॅन, एफडीए नोंदणी सक्तीची करत सिंधुदुर्गातील मासळीची वाहतूक रोखण्यात आली आहे. गोव्याचे अंतर दोन तासाचे असल्याने मासळीची वाहतूक करण्यास इन्सुलेट वाहनांची आवश्यकता नाही. शिवाय गोव्याच्या आरोग्य विभागाकडून सर्व वाहनांची तपासणी होत आहे. यामुळे गोवा सरकारने ही सक्ती न हटविल्यास संघर्ष करण्याचा इशारा येथील मत्स्य व्यावसायिकांनी दिला आहे.

शहरातील गवंडीवाडा येथे मत्स्य व्यावसायिक हरी खोबरेकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील मच्छीमार, एजंटांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न गोवा सरकार करतेय. इन्सुलेट, एफडीए नोंदणी सक्ती करत सिंधुदुर्गातील सुमारे शंभरहून अधिक मासळीच्या गाड्या माघारी पाठविल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील मासळी खरेदी प्रक्रिया पूर्णतः थंडावली आहे. आमच्या गाड्या रोखल्याने गोव्याच्या एजटांना व गाड्यांना रोखण्यात आले असून गोव्यातील गाड्या सिंधुदुर्गात येऊ देणार नाही असा इशारा खोबरेकर यांनी दिला.

अन्न, औषध प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यातील मत्स्यविक्रेते एफडीए अंतर्गत नोंदणी करतील. पण मालवण ते गोवा हे अंतर तीन तासाचे असल्याने या कालावधीत मासळी खराब होण्याची शक्यताच नाही. इन्सुलेट वाहन घेणे तांत्रिक, आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने याची सक्ती करू नये. अनेक तरुणांनी कर्जे घेत गाड्या घेतल्या असून गोवा सरकारच्या या निर्णयामुळे ते कर्जबाजारी होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे मच्छीमार, एजंट यांची लवकरच एकत्रित बैठक घेत संघर्षाची पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचेही खोबरेकर यांनी सांगितले. यावेळी लीलाधर पराडकर, नरेश हुले, शक्ती नागवेकर, नावेल वाघ, बाप्पा काळसेकर, राजा बटाव, विली डिसोझा, सुनील ताम्हणकर, बबलू पिंटो, नीलेश तांडेल, जमाल लुद्रिक, जपा नर्‍होंना आदी व्यावसायिक उपस्थित होते.

सिंधुदुर्गातच होलसेल मासळी मार्केटसाठी प्रयत्न

आगामी काळात सिंधुदुर्गातच होलसेल मासळी मार्केट उभारणीचे प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच कोल्ड स्टोरेज कंपनी, मत्स्य प्रक्रिया करणाऱ्या अन्य कंपन्या जास्तीत जास्त प्रमाणात कश्या आणता येईल. याचा पाठपुरावा लवकरात लवकर सुरू करणार आहोत. असे खोबरेकर यांनी यावेळी सांगितले.