
सामना प्रतिनिधी । मुंबई
न्यूयॉर्कमध्ये हायग्रेड कॅन्सरवर उपचार घेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या तब्येतीत सुधारणा होत असून ती डिसेंबर महिन्यात मायदेशी परत येऊ शकते अशी आनंदाची बातमी तिची मैत्रीण आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिने दिली आहे. पती अभिनेता महेश बाबू आणि मुलांसोबत नम्रता सुट्टीसाठी न्यूयॉर्कला गेली होती.
न्यूयॉर्कमध्ये तिने सोनालीची भेट घेतली. सोनाली आणि नम्रता यांनी जवळपास दोन तास मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘सोनाली खूपच शूर आहे. आता ती पहिल्यासारखीच फिट दिसत आहे. लवकरच तिचे आयुष्य पूर्वीसारखे सुरू होईल’, असे नम्रताने एका मुलाखतीत म्हटले आहे. जुलै महिन्यात सोनालीला हायग्रेड कॅन्सरचे निदान झाले होते. तेव्हापासून तिच्यावर अमेरिकेत उपचार सुरू आहेत. यादरम्यान अक्षयकुमार, सुझान खान, प्रियांका चोप्रा, नितू सिंग, अनुपम खेर यांनी सोनालीची भेट घेऊन तिच्या तब्येतीची विचारपूस करत तिला धीर दिला.






























































