
सामना प्रतिनिधी । मुंबई
म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्याला 20 हजारांची लाच घेताना अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याच्या घटनेला 24 तास उलटत नाहीत तोच आता म्हाडाचा उपअभियंता आज खासगी इसमाच्या मदतीने एका विकासकाकडून 13 लाख 50 हजारांची लाच घेताना ट्रॅप झाला.
अमोल बुधकोंडवार असे या उपअभियंत्याचे नाव असून ते म्हाडाच्या वांद्रे येथील ‘सी’ विभागात कार्यरत आहे. अर्जुन (नाव बदललेले) हे जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा व्यवसाय करतात. त्यांनी धोबी तलाव येथील अल्पाईवाला इमारतीच्या पुनर्विकासाचे काम घेतले होते. या कामासाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांनी म्हाडात अर्ज केला होता. अर्जुन यांना ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी बुधकोंडवार याने 18 लाखांची मागणी केली होती. त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी 13 लाख 50 इतकी लाच घेण्याचे बुधकोंडवार याने मान्य केले होते, मात्र लाच द्यायची नसल्याने अर्जुन यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती. त्यानंतर आज खासगी इसम मोहम्मद शहनवाझ शमशूल शेख (33) याच्याकडे 13 लाख 50 हजार लाचेची रक्कम देऊन अर्जुन यांनी बुधकोंडवार याला देण्यास सांगितली. हा प्रकार सेनापती बापट मार्गावरील रघुवंशी मेन्शन येथे घडला. तेथेच लाचेची रक्कम घेताना शेख याला पकडून पोलिसांनी बुधकोंडवार याला ताब्यात घेतले.
कालच एका कंत्राटदाराकडून 20 हजारांची लाच घेताना चंदनवाडी येथील म्हाडाचा कार्यकारी अभियंता सूर्यकांत देशमुख याला पकडण्यात आले होते.
























































