
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूडमधील लव्हबर्ड म्हणून ओळखली जाणारी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची जोडी अखेर 14 आणि 15 नोव्हेंबर 2018ला विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाला अवघे बारा दिवस बाकी असताना दीपिकाच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे. आजपासून दीपिकाच्या घरी लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. लग्नाआधी करण्यात येणारी नंदी पूजा आज दीपिकाच्या घरी पार पडली असून त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या विधीच्या वेळी दीपिकाने गडद नारिंगी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला असून या साध्या लूकमध्ये देखील ती फार सुंदर दिसतेय.

रणवीर आणि दीपिका या दोघांनीही काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाची घोषणा केली. ‘आम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की, दोन्ही घरच्या कुटुंबीयांच्या आशीर्वादाने मी अणि दीपिका 14 आणि 15 नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार आहोत. गेली अनेक वर्षे तुम्ही आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. प्रेम, एकनिष्ठा, मैत्री आणि साहचर्य यांचा संगम असलेल्या ‘लग्ना’चा प्रवास आता सुरू होणार आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहोत, हीच अपेक्षा,’ अशा शब्दात रणवीर व दीपिकाने सोशल मीडियावरून त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
























































