माणगाव दत्त मंदिर दीपमाळेचा कळस स्थानिक कलाकाराने घडवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

माणगाव दत्त मंदिरच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्यात आले असून दत्त मंदिरासमोरील दीपमाळेच्या कळसाला आकार माणगावच्या स्थानिक कलाकाराने दिलेला आहे. माणगाव बेनवाडी येथील रुपेश मनोहर मेस्त्री या दगडावर काम करणाऱ्या शिल्पकाराने कळसाचे सुरेख कोरीव काम केले. कर्नाटकातील एकसंध कृष्णशीला दगडावर कोरीव काम करून जवळपास दोनशे किलो वजनाचा अप्रतिम कळस बनविला आहे. तो कळस दीपमाळेवर बसविण्यात आला आहे.

रुपेश याने सावंतवाडी आयटीआय मध्ये सुतारकामाचे प्रशिक्षण घेऊन बेंगलोर व मुंबई येथे दगडावर काम करण्याचे प्रशिक्षण घेतले असून विविध दगडी मूर्तीही बनविल्या आहेत. शिवाय लाकडावर कोरीव काम करून गणेश मूर्ती सुद्धा बनविलेल्या आहेत. दत्त मंदिर दीप माळेच्या कळसाला आकार देण्यासाठी वीस दिवस लागल्याचे रुपेश याने सांगितले. दगडावर काम करताना खूप जपून व सावधगिरीने काम करावे लागते. कारण दगडाचा चुकून एखादा कपचा उडून तुमच्या केलेल्या कामाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सावधगिरी व सबुरी महत्वाची असते आणि म्हणून दगडावर काम करणारे कारागीर जिल्ह्यात खूप कमी प्रमाणात आहेत. आपल्या हातून घडलेला दगडी कळस माणगाव दत्तमंदिराच्या दीपमाळेवर बसविला ही आपल्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ठ असल्याचे रुपेश सांगतो.