
सामना प्रतिनिधी, मुंबई
गेल्या वर्षीपेक्षा सोन्याच्या दरात यंदा दोन हजार रुपयांची वाढ होऊन तो 32,690 रुपयांवर पोचला आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने सोनेखरेदी घटेल अशी भीती सराफांना होती. मात्र धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत ग्राहकांनी लगीनसराईचे प्रीबुकिंग केल्यामुळे मार्केट सावरले. सोनेखरेदीत 7 ते 10 टक्क्यांची वाढ झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यातही हिऱ्यांच्या दागिन्यांना ग्राहकांची पसंत दिसत आहे.
गेल्या वर्षी दिवाळीत सोन्याचा दर 30,710 रुपये प्रति तोळा इतका होता. या वर्षी दरात 2 हजार रुपयांची वाढ होऊन तो 32,690 रुपये इतका झाला आहे. दर वाढल्याने ग्राहकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी दागिन्यांऐवजी सोने आणि चांदीच्या नाण्यांच्या खरेदीकडे मोर्चा वळवला. नाण्यांची मागणी कॉर्पोरेट कंपन्यांकडून जास्त झाली. सोन्याप्रमाणे हिऱ्यांच्या आभूषणांकडे ग्राहकांचा ओढा दिसत आहे. डायमंड ज्वेलरीच्या मागणीत गेल्या वर्षीपेक्षा 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे. ग्राहक डायमंड ज्वेलरी हे विश्वसनीय ब्रँडकडून खरेदी करत असून बायबॅक गॅरंटीदेखील लक्षात घेत आहेत. देशभरात 4 लाखांपेक्षा अधिक ज्वेलर्स आहेत. आतापर्यंत त्यापैकी 22 हजार ज्वेलर्सनी हॅलमार्किंगचा परवाना मिळवलेला आहे.
सोने कडाडणार
गेल्या वर्षीपेक्षा सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची वाढ झालेली आहे. येत्या काही महिन्यांत सोने प्रतितोळा 38 ते 40 हजारांचा टप्पा गाठेल, अशी शक्यता बुलियन अॅण्ड ज्वेलरी मार्केटने व्यक्त केली आहे. धनत्रयोदशीला गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी खरेदीत 7 ते 10 टक्के वाढ झाली आहे. ग्राहक उत्सवकाळात फक्त सवलतींकडे बघत नसून उत्पादन गुणवत्ता, डिझाइन, ब्रॅण्ड, घडणावळ या गोष्टींचा विचार करून एकंदर खरेदीचा अनुभव बघत आहेत.
-सौरभ गाडगीळ, संचालक इंडियन बुलियन ऍण्ड ज्वेलरी असोसिएशन
सोन्याचे चढे दर पाहता काही दिवसांपूर्वी धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची मागणी 10 ते 15 टक्के घटेल, असा आमचा अंदाज होता. मात्र आज 5 ते 7 टक्के विक्री वाढलेली आहे.
-नितीन खांडेलवाल, अध्यक्ष जेम्स ऍण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन
summary- gold purchasing increases by 10 per cent on diwali
























































