विना आवाजाचे फटाके कधीही वाजवा- मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

सर्वोच्च न्यायालयाने रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके फोडण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे बच्चे कंपनीमध्ये नाराजी निर्माण झाली आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुड न्यूज दिली आहे. विनाआवाजाचे फटाके वाजवण्यावर निर्बंध नाहीत. ते कधीही वाजवता येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले

वर्षा बंगल्यावर पत्रकारांशी गप्पा मारताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीपासून दिवाळीत फटाके वाजवण्यावर घातलेले निर्बंध यावर भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजवण्यावर निर्बंध आणले आहेत याबद्दल पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता विनाआवाजाचे फटाके वाजवण्यावर निर्बंध नाहीत. ते कधीही वाजवता येतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. लहानपणी मी फटाके खूप उडवायचो, पण जसे वय वाढत गेले तसे फटाके कमी झाले आणि उडवायचे बंद केले. आता फार तर माझ्या मुलीसोबत एखाददुसरी फुलबाजी पेटवतो असे मुख्यमंत्री म्हणाले.

दुष्काळी भागाचा दौरा
राज्यातील 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता आपण दुष्काळी भागांचा स्वतः दौरा करणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. राज्यात 49 लाख 50 हजार शेतकऱयांची कर्जमाफीसाठी नोंद झाली आहे. शेतकऱयांना 21 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. दुष्काळी भागात कोणत्याही उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याचा मी प्रत्यक्ष जाऊन आढावा घेणार आहे. दुष्काळाची माहिती घेण्यास सुरुवातही केली आहे. विरोधी पक्षांना यावर केवळ राजकारण करायचे आहे असा आरोप त्यांनी केला.

summary- cm devendra fadnavis clears about crackers