
सामना प्रतिनिधी । नांदुर्गा
सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर करावा, जनावरांसाठी छावणी सुरू करुन चारा, पाण्याची व्यवस्था करावी या आणि इतर मागण्यांसाठी औसा तालुक्यातील मौजे मंगरुळ येथील माजी सैनिक मनोहर पाटील हे मंगळवारी सकाळी ७ वाजता नांदुर्गा हद्दीतील मोबाईल टॉवरवर चढले. या आंदोलनाची तत्काळ दखल घेऊन ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठीच आपण टॉवरवर चढलेलो असून आत्महत्या करण्यासाठी नाही, असे त्यांनी दैनिक ‘सामना’शी बोलतांना सांगीतले.
नांदुर्गा हद्दीतील मोबाईल टॉवरवर माजी सैनिक मनोहर पाटील हे तिरंगा ध्वज हातात घेऊन सुमारे ३५० फुट उंचीवर चढले. औसा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, जनावरांसाठी चारा, पाण्याची व्यवस्था करण्यासाठी छावण्या सुरु कराव्यात. शेतीमालास हमीभाव जाहीर न करता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. सर्वसामान्य नागरीक, शेतमजूर, कष्टकरी यांना मासिक ५००० रुपये देण्यात यावेत या आणि इतर मागण्यांसाठी थेट टॉवरवर चढून त्यांनी आमरण उपोषण छेडण्याचा इरादा सांगितला.
नांदुर्गा येथील सामनाचे वार्ताहर गणेश कुंभार यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी आत्महत्या करण्यासाठी टॉवरवर चढलेलो नाही तर शासनाने या भागातील परिस्थितीची पाहणी करावी. रब्बीची पेरणी हातातून गेलेली आहे. खरीपाचे पिक आलेले नाही. शेतकऱ्यांची अवस्था कठीण आहे. लातूर जिल्ह्यातील केवळ शिरुर अनंतपाळ तालुक्यात शासनाने मध्यम दुष्काळ जाहीर केलेला आहे. हा लातूर जिल्ह्यातील जनतेवर अन्याय आहे.
या उपोषणाची दखल घेऊन गुबाळ, नांदुर्गा, मंगरुळ येथील ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामस्थ टॉवरजवळ धावले. जो पर्यंत आपणास लेखी हमी दिली जाणार नाही तोपर्यंत टॉवरवरील उपोषण आपण सोडणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे. दुपारी उशीरापर्यंत तोडगा निघाला नव्हता.




























































