
सामना प्रतिनिधी । लखनौ
अयोध्येत राममंदिर कधी बांधणार यावर मौन बाळगणारे भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी ‘रामायण’ घडविले. फैजाबाद जिल्ह्याचे अयोध्या असे नामांतर केले. अयोध्येतील प्रस्तावित विमानतळास प्रभू श्रीराम आणि वैद्यकीय महाविद्यालयाला दशरथ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी अलाहाबादचे नामांतर प्रयागराज असे करण्यात आले आहे. दिवाळीनिमित्त आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राममंदिराबाबत काही भाष्य केले नाही. अयोध्येवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही असे मोघम वक्तव्य त्यांनी केले. अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर प्रभू श्रीरामाचा भव्य पुतळा उभा करण्याबाबतही काही सांगितले नाही. फैजाबाद जिल्ह्यात अयोध्येचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून यापुढे अयोध्या असेल अशी घोषणा केली. अयोध्येत विमानतळ उभारून त्याचे नाव प्रभू श्रीराम असेल तसेच मेडिकल कॉलेजचे नाव दशरथ असे करण्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, अयोध्येतील दीपोत्सव कार्यक्रमाला दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडी किम जुंग सूक या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.



























































