
सामना प्रतिनिधी । बीड
बीड शहरातील रस्त्याची अवस्था बघून आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी मोठा निधी शहराच्या विकासासाठी पदरात पाडून घेतला, आता नाली बांधकाम आणि रस्ते पूर्ण होणार आहेत. 16 रस्त्यासाठी 88 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती देण्यात आली.
बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले की, राजकीय मतभेद विसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी विकास कामासाठी मोठे सहकार्य केले. नगर पालिकेच्या माध्यमातून बीड शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. एकीकडे पाणी पुरवठा योजना, ड्रेनेज योजना आणि आता शहरातील रस्ते बांधकाम पूर्ण होणार आहे. शहरात 16 विविध रस्त्याना मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी 88 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विजेचे ट्रान्सफॉर्मर, नवीन भागात दिवे, नवीन लाईन ला मंजुरी मिळाली आहे. शहराचा आराखडा पूर्ण झाला आहे. पायाभूत सुविधा पूर्ण केल्या जाणार आहेत.
पुढील वर्षी पेयजल योजनांचे पाणी शहराला मिळणार आहे. त्या ठिकाणी सोलार प्रकल्प उभारला जात आहे. त्यामुळे वीज बिल बचत होणार आहे. एल ए डी लाईट लावले जात आहेत. त्यातून शहर उजळून निघणार आहे.
बीड शहरासह बीड मतदार संघाच्या विकासासाठी काम हाती घेतले आहे. बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळाचे वास्तव आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोर विषद केले आहे. जिल्ह्यातील दुष्काळ उपाय योजनांसाठी तातडीने नियोजन करणे गरजेचे आहे. दूध दर वाढ आवश्यक आहे. शेतीला जोड धंदा उपलब्ध होईल, असेही आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, दिलीप गोरे, विलास बडगे, अरुण डाके, गणपत डोईफोडे, विलास विधाते,वैजिनाथ तांदळे आदी उपस्थित होते.































































