छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून 6 भूसुरूंग स्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। बीजापूर

छत्तीसगडमधे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षली हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी कांकेर जिल्ह्यातील गोमे आणि गट्टाकाल येथे नक्षलवाद्यांनी 6 साखळी भूसुरूंग स्फोट घडवले . यात बीएसएफचा एक जवान जखमी झाला आहे. तर बीजापूरमधील बेदरे भागात सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. यात एक नक्षलवादी ठार झाला असून एकास जवानांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

छत्तीसगडमध्ये 12 नोव्हेंबरला 18 नक्षलग्रस्त भागात पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. बस्तर, कांकेर, सुकमा, बीजापूर, दंतेवाडा, नारायणपूर कोंदगांव आणि राजनांदगांवमध्ये हे मतदान होणार आहे. या निवडणुकांना नक्षलवाद्यांचा विरोध असल्याने या भागात बीएसएफ , एसटीएफ, आणि डीआरजीच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली आहे. याच मोहीमेदरम्यान बीजापूर येथे नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. यावेळी उडालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला असून अन्य एकास ताब्यात घेण्यात आले आहे.

तर दुसरीकडे कांकेर जिल्ह्यात गोमे आणि गट्टाकाल या दरम्यान नक्षलवाद्यांनी केलेल्या 6 साखळी भूसूरूंग स्फोटात एक जवान जखमी झाला. कोयलीबेडा भागात गस्तीवर निघाले होते. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी हे स्फोट घडवून आणले. याआधी गुरुवारीही दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी स्फोटकांनी एक बस उडवून दिली. यात 4 जण ठार झाले. तर एक जवान शहीद आणि दोन जवान जखमी झाले आहेत.