
सामना प्रतिनिधी। नगर
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 91 हजार 960 रुपये व मोबाईल लांबवणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळक्याला गजाआड केले आहे. नवनाथ रामभाऊ पालवे या शेतकऱ्याने याबदद्ल तक्रार केली होती. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राजू विनायक पगारे (35, मजलेशहर, ता. शेवगाव), गोकुळ भानदास पगारे (37, मजलेशहर, ता. शेवगाव), संजय बाबासाहेब पवार (28, भायगाव, ता. शेवगाव), अशोक मनोहर कचरे (27, नवीन दहिफळ, ता. शेवगाव) व शिवाजी पंडित गोलवड (27, नवीन दहिफळ, ता. शेवगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, हा गुन्हा राजू पगारे याने केला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे, रवींद्र कर्डिले, विजय वेठेकर, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, सुरेश माळी, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, सुनील चव्हाण, विनोद मासाळकर, विजय ठोंबरे, संदीप पवार, सोन्याबापू नानेकर, सचिन अडबल, राहुल सोळंके, बाबासाहेब भोपळे यांच्या पथकाने सापळा रचून राजू पगारे याला ताब्यात घेतले. सहकार्यांसह हा गुन्हा केला असल्याची कबुली त्याने दिली.
त्यानुसार इतर आरोपींना अटक करण्यात आली. फिर्यादी पालवे यांच्या शेतात काम करणारे शोभा जयचंद्र गोसावी व विलास रंगनाथ माळी यांनी दिलेल्या माहितीवरून आरोपींनी हा दरोडा टाकला होता. आरोपींकडून गुन्ह्यात चोरलेला मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. शोभा व विलास मात्र फरार आहेत.

































































