
सामना प्रतिनिधी । पाथर्डी
पाच जणांच्या टोळीने अवघ्या एका तासात तब्बल अकरा ठिकाणी घरफोडी केल्याची घटना तालुक्यातील चिचोंडी येथे घडली. या घटनेने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत या चोरांचा छडा लावण्याची मागणी केली. या चोऱ्या करताना हे चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून काही ठिकाणी चोरी करताना मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
शनिवारी रात्री 2.30 वाजता पाच चोरटे दोन दुचाकींवरून चिचोंडी गावात आले. त्यांनी सुरुवातीला कैलास भानुदास आव्हाड यांच्या मेडिकल दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला. मात्र दुकानात केवळ औषधे असल्याने चोरट्यांनी दुकानातील कॅटबरी चोरून नेली. दुकानातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला. त्यानंतर चोरट्यांनी सोमनाथ पालवे यांच्या किराणा दुकानात चोरी करत दुकानातील 15 हजार रुपयांची रोकड लांबवली. यानंतर चोरट्यांनी संदीप नजन, गोरक्ष पालवे, बाळासाहेब पावशे, अशोक कांबळे, चंद्रकांत ईपरकर यांच्या घरी जाऊन किरकोळ सामान लंपास केले. यानंतर चोरटे पंडित सराफ यांच्या दुकानात चोरी करण्यास गेले. शटरला हात लावताच सायरन वाजल्याने चोरटे पसार झाले. ग्रामस्थ जागे झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. सोमनाथ पालवे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून हा प्रकार घडल्या नंतर ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत चोऱ्यांचा तपास लावण्याची मागणी केली. चिचोंडी येथे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी,उपनिरीक्षक दिनकर मुंडे यांनी गावाला भेट देत श्वानपथक व ठसेतज्ञाला पाचारण केले. मात्र, अद्याप पोलिसांच्या हाती ठोस पुरवा लागलेला नाही.






























































